छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी १६ मतदारसंघात यश मिळविणाऱ्या भाजपने आपल्या बाजूने जनमत वळविण्यासाठी आता छत्तीसगडमधील २६ कार्यकर्त्यांना प्रत्येकी एक मतदारसंघ बांधणीसाठी वाटून दिला आहे. हे कार्यकर्ते मतदारसंघातील समस्या व जनमत बाजूने करण्यासाठी कसा संपर्क करावा, कोणता मुद्दा उचलावा तसेच अंतर्गत धुसफूस याची माहिती भाजपातील वरिष्ठ नेत्यांना सांगणार आहेत. पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव या उपक्रमावर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा >>> भाजपचे ‘खेटरे मारा’ आंदोलनाने उत्तर; पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या कामांसाठी दिल्ली येथील एक निरीक्षक छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी थांबणार आहेत. तर नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव या मतदारसंघासाठी स्वतंत्र व्यक्तींच्या नेमणुका करण्यात आल्या आल्याचे सांगण्यात आले. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी विधानसभा निवडणुकांसाठी छत्तीसगडच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत बांधणी होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक १६ आमदार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर मराठवाड्यात महायुतीची राजकीय ताकद वाढली. शिवेसना शिंदे गटाचे नऊ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. म्हणजे ४६ पैकी ३१ आमदार महायुतीचे आहेत. मात्र, असे असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात एकही जागा मिळाली नाही.

हेही वाचा >>> महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली तर दंगली होतात; चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, महायुतीची टीका

अतुल सावे, प्रशांत बंब, संतोष दानवे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, भीमराव केराम, तुषार राठोड, राजेश पवार, नमिता मुंदडा, लक्ष्मण पवार, राणाजगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, तान्हाजी मुटकुळे, अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांना आपापले मतदारसंघ राखा, असे संदेश देण्यात आले आहेत. निवडून आलेल्या आमदरांपैकी हरिभाऊच्या मतदारसंघात भाजपला नवा उमदेवार द्यावा लागणार आहे. तर परळी येथे भाजप उमेदवार असणार नाही. मराठवाड्यातील २६ जागा भाजप लढवेल, असे आता सांगण्यात येत आहेत. त्यामुळे या २६ मतदारसंघात छत्तीसगडातील कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटास आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेस किती जागा दिल्या जातात, याचीही उत्सुकता मराठवाड्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दावा करू लागले आहेत. आता परराज्यातील कार्यकर्त्यांचा चमू भाजपने वापरण्यास सुरुवात केली आहे.