देशात लोकसभा निवडणुकांपूर्वी २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या सदस्य संख्येत बदल होणार नसला तरीही स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत २८ नावांपैकी २४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या द्विवार्षिक निवडणुकीत एकूण ५६ जागा रिक्त आहेत. भाजपाने निवृत्त होणार्‍या २८ खासदारांपैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या चार खासदारांमध्ये पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अश्विनी वैष्णव ओडिशातून; तर भाजपाचे वरिष्ठ प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेच्या निवृत्त खासदारांना मिळणार लोकसभेचे तिकीट?

राज्यसभेसारख्या वरिष्ठ सदनाचा अनुभव असणाऱ्या नेत्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवावी, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फार पूर्वीच स्पष्ट केले होते. बुधवारी नावांच्या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, नारायण राणे, पुरुषोत्तम रुपाला, व्ही. मुरलीधरन आणि राजीव चंद्रशेखर लोकसभेच्या रिंगणात उतरतील, हे काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. ज्या राज्यसभा खासदारांना तिकीट दिले नाही, त्या खासदारांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या नावाचाही समावेश आहे.

ऑगस्टमध्ये एनडीएच्या खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, प्रत्येक राज्यसभेच्या खासदाराने किमान एक तरी निवडणूक लढवावी. यातून त्यांना निवडणुकीचा अनुभव येईल. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पंतप्रधान मोदींना राज्यसभा खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात आणायचं आहे. यात ओडिसामध्ये प्रधान, केरळमध्ये मुरलीधरन, केरळ किंवा कर्नाटकात चंद्रशेखर, गुजरातमध्ये मांडविया आणि रुपाला; तर राजस्थान किंवा हरियाणात भूपेंद्र यादव यांना भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे.

ओडिशामध्ये बीजेडी आणि भाजपाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे सर्वेसर्वा नवीन पटनायक या स्पर्धेतून बाहेर पडल्यास भाजपाला पक्ष वाढवण्यास मोठी संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि भाजपाचा तंत्रज्ञान-जाणकार चेहरा राजीव चंद्रशेखर हे मल्याळी असून बेंगळुरूचे रहिवासी आहेत. यामुळेच केरळ आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी ते योग्य चेहरा आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातचे असल्यामुळे गुजरातमध्ये भाजपा अधिक मजबूत करण्याचे पक्षाचे ध्येय आहे; तर राजस्थानमध्ये पक्ष वसुंधरा राजे यांच्या धोरणांतून बाहेर पडण्याचा आणि पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे हरियाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे अजूनही पक्षाचे मजबूत नेते म्हणून पाहिले गेले नाही.

राज्यसभा खासदारांना सुरक्षित जागेवरून उभे केले जाईल

भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, जे राज्यसभेचे खासदार यावेळेस सार्वत्रिक निवडणूक लढवतील त्यांना सुरक्षित जागांवरच उभे केले जाईल. अमरेली किंवा राजकोटसाठी रुपाला यांचे नाव चर्चेत आहे. भावनगर/पोरबंदर/सुरतसाठी मांडविया; राजस्थानमधील अलवर किंवा हरियाणातील भिवानी-महेंद्रगडसाठी भूपेंद्र यादव; छत्तीसगडमधील कोरबा येथे सरोज पांडे; पौरी गढवालसाठी बलूनी आणि केरळमधील अटिंगलसाठी मुरलीधरन यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, राज्यसभेतील ज्या खासदारांकडे खाती आहेत त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यातून लांब ठेवले आहे. कारण लोकसभेच्या प्रचार-प्रसाराचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो. यामुळेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले जाणार नाही.

अनेक गोष्टी लक्षात घेऊन राज्यसभेचे तिकीट वाटप करण्यात आले आहे. राज्यसभेच्या उमेदवार यादीत २८ उमेदवारांपैकी पाच महिला आहेत. यात जातीय समतोलही लक्षात ठेवला गेला आहे. राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही नवीन चेहरे दिसतील, असे संकेत भाजपाने दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की, लोकसभेत भाजपासाठी ३७० जागांचे मोदींचे लक्ष्य आहे. “मोदीजींचे नवे सरकारही नव्या चेहऱ्यांनी भरलेले असेल,” असा अंदाज पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. सूत्रांनुसार, या चेहर्‍यांपैकी एक चेहरा नड्डा यांचा असू शकतो. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे.

हेही वाचा : हत्तींचा वाढता हैदोस; केरळमध्ये माणूस-प्राणी संघर्ष शिगेला, यामागचे नेमके कारण काय?

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आर.पी.एन. सिंग यांनाही राज्यसभेचे तिकीट दिले आहे. जानेवारी २०२२ मध्ये सिंग भाजपामध्ये सामील झाले, तेव्हापासून सिंग योग्य पदाच्या प्रतीक्षेत होते. अखेर भाजपाने या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. मंगळवारीच भाजपामध्ये दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत वरिष्ठ नेतृत्वाच्या बैठकीनंतर लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 of 24 new faces of bjp for rajyasabha rac
Show comments