मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३४५ उमेदवारांना इतकी कमी मते पडली आहेत की त्यांना आपली अनामत रक्कमही जपता आलेली नाही. मुंबईतील एकूण ४२० उमेदवारांपैकी केवळ ७५ उमेदवारांनी भरघोस मते मिळाली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लढतीत अपक्ष आणि लहान पक्षाच्या उमेदवारांकडे मतदारांनी दुर्लक्ष केले असल्याचे आढळून आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मिळून ३६ मतदारसंघांसाठी ४२० उमेदवार उभे होते. मोठ्या संख्येने उमेदवार उतरलेले असले तरी प्रत्यक्षात यावेळची लढत ही शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुती व काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडीतच होती. तरीही अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष, बंडखोर, लहान पक्षांचे उमेदवार उभे होते.
हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाची प्रतीक्षा; शिंदे-अजितदादांच्या पक्षांचा आपल्या नेत्यासाठी दबाव, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे लक्ष
निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार उमेदवाराला एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी उमेदवारांना दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती. तर आरक्षणांतर्गत असलेल्या उमेदवाराला हीच रक्कम पाच हजार रुपये होती. सर्वच मतदारसंघांत युती व आघाडी अशी लढत असल्यामुळे पहिल्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त सर्वांचीच अनामत रक्कम जप्त झाली.
हेही वाचा >>> नव्या विधानसभेवरही घराणेशाहीचाच पगडा
सर्वात जास्त २२ उमेदवार जोगेश्वरी पूर्वमध्ये
मुंबईतील ३६ मतदारसंघांत सर्वात जास्त उमेदवार जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघात होते. या मतदारसंघात २२ उमेदवार होते. त्यापैकी विजयी उमेदवार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अनंत नर आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मनीषा वायकर ही दोन नावे वगळता सर्व २० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.
तीन उमेदवारांमुळे चुरस पहिल्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त सर्वांचीच अनामत रक्कम सर्व मतदारसंघात जप्त होणार असली तरी तीन मतदारसंघांत तीन उमेदवारांनी भरघोस मते घेऊन निवडणुकीत चुरस आणली. त्यात माहीम, मानखुर्द, अणुशक्तीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचीही अनामत रक्कम जप्त होणार आहे.