हिवाळी अधिवेशन आणि खुर्चीचे तप्त राजकारण!

राज्यातील पाच मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनानंतर खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते तर, शरद पवार यांनी आपले मुख्यमंत्रीपद थोडक्यात राखले होते.

5 cm of the maharastra step down after the winter session sharad pawar retained his post as chief minister
प्रातिनिधिक फोटो: लोकसत्ता टीम

मुंबई : नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे थंडीच्या कडाक्यात चालणारी गरमागरच चर्चा. अधिवेशनातील्या कामकाजापलिकडे होणाऱ्या भेटीगाठी आणि रंगणाऱ्या गप्पांच्या मैफिली आणि मेजवान्या यांचीही चर्चा दरवर्षी या अधिवेशनाआधी आणि नंतरही होत असते. पण हिवाळी अधिवेशनाशी एक रंजक इतिहासही जोडला गेला आहे. तो म्हणजे, राज्यातील पाच मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनानंतर खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते तर, शरद पवार यांनी आपले मुख्यमंत्रीपद थोडक्यात राखले होते.

वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, मनोहर जोशी, विलासराव देशमुख (पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना) यांना नागपूरचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यावर काही दिवसांमध्येच राजीनामा द्यावा लागला होता. . १९९१ मध्ये शरद पवार यांच्या विरोधात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आदींनी हिवाळी अधिवेशनानंतरच बंड केले होते. पण तेव्हा पवारांना काँग्रेस नेतृत्वाने पाठबळ दिले होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशन ही मुख्यमंत्र्यांसाठी कसोटी ठरते, असेही बोलले जाते.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : भाजपच्या नेतेमंडळींच्या घरात उमेदवारी; घराणेशाहीत अनेकांना संधी

राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० मुख्यमंत्री झाले असले तरी केवळ दोघांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे तर तिघांना गैरव्यवहार किंवा घोटाळ्यांमुळे पायउतार व्हावे लागले आहे. बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाबासाहेब भोसले यांनी ‘भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची’ अशा शब्दांत आमदारांच्या बंडाचे वर्णन केले होते. त्यांचे हे विधान राज्याच्या इतिहासात चांगलेच गाजले होते. आमदार अंगावर धावून गेल्याने बाबासाहेब भोसले यांना चपला टाकून बैठकीतून पळ काढावा लागला होता. हिवाळी अधिवेशन पार पडताच थोड्याच दिवसांत त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले होते. बॅ. ए. आर. अंतुले, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, अशोक चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांना गैरव्यवहारावरून पदावरून पायउतार व्हावे लागले. अंतुले यांना सिमेंट घोटाळा अंगलट आला तर मुलीचे गुण वाढविल्याच्या आरोपांवरून निलंगेकर-पाटील यांचे मुख्यमंत्रीपद गेले. ‘आदर्श’ घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. जावयासाठी पुण्यातील जमीनेच आरक्षण बदलल्यावरून मनोहर जोशी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, पण त्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन ताज हॉटेलची ‘पाहणी’ केल्यानंतर निर्माण झालेल्या वादात विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 cm of the maharastra step down after the winter session sharad pawar retained his post as chief minister print politics news zws

First published on: 21-10-2024 at 06:49 IST
Show comments