गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५६ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला. या विजयाने भाजपाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. विधानसभा निकालानंतर भाजपाने गुजरातमधील आणि देशातील पहिल्या अमूल दूध डेअरीकडे आपला मोर्चा वळवला. १९४६ साली भारतातील पहिली डेअरी सहकारी संस्था म्हणून अमूलची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून अमूल दूधसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.
यामुळे अमूल वगळता गुजरातमधील १८ दूध सहकारी संस्था १०० टक्के भाजपाच्या ताब्यात आहेत. अमूल ही एकमेव डेअरी सहकारी संस्था आहे, ज्यात काँग्रेसचे काही सदस्य बाकी आहेत. इतर दूधसंघात १०० टक्के भाजपाचे सदस्य आहेत.
भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने अमूल डेअरीवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांनी अमूलच्या बोर्डवर असणाऱ्या काँग्रेसच्या पाच नेत्यांना भाजपामध्ये आणलं. त्यानंतर मंगळवारी अखेर भाजपा नेते विपुल पटेल यांची सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी आणि काँग्रेसमधून नुकतंच भाजपावासी झालेल्या कांती परमार सोढा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
यापूर्वी, २००२ पासून अमूल डेअरीचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार रामसिंह परमार यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आनंद आणि खेडा हे जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले असल्याने अमूल बोर्डावर अजूनही काँग्रेसचा वरचष्मा कायम होता. पण गेल्या आठवड्यात भाजपाच्या मास्टरस्ट्रोकमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमूल डेअरीवरील पक्षाचं वर्चस्व संपुष्टात आलं. अमूल डेअरीच्या पाच संचालकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या पाच दिवसांत काँग्रेसने अमूल डेअरीच्या संचालक मंडळातील चार संचालक तर गमावलेच शिवाय शेवटचा बालेकिल्लाही ढासळला. अमूलच्या संचालक मंडळातील काँग्रेसच्या चार नेत्यांनी ११ फेब्रुवारी रोजी गांधीनगर येथे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ दोनच सदस्य उरले आहेत. जोवनसिंह चौहान (मोडज), सीता चंदू परमार (तारापूर), शारदा हरी पटेल (कपडवंज) आणि घेला मानसिंह झाला (काठलाल) या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सप्टेंबर २०२०मध्ये पार पडलेल्या दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने ११ पैकी आठ जागा जिंकल्या होत्या. पण काँग्रेसचे माजी आमदार कांती सोडा परमार यांनी गेल्यावर्षी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता अन्य नेतेही भाजपावासी झाले. परिणामी अमूल डेअरीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली.