काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय संपादन केला आहे. त्यामुळे सुमारे २५ वर्षांनंतर बिगर-गांधी नेता काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आता ८० वर्षीय खरगे यांच्या खांद्यावर पक्षाची पुनर्बांधणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. मागील काही वर्षांत काँग्रेसला सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे खरगे यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या वैभवशाली भूतकाळातून बाहेर पडावं लागेल
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाला मोठा वैभवशाली राजकीय इतिहास आहे. पण मागच्या काही वर्षांत काँग्रेसची झालेली अवस्था अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाला आता काँग्रेसच्या जुन्या इतिहासात रमून चालणार नाही, त्यांना वस्तुस्थिती लक्षात घेऊन मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करावं लागेल. लोकांच्या मनात काँग्रेस पुन्हा रुजवण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळे प्रयत्न करावे लागतील.

गांधी-नेहरू कुटुंबाचं नियंत्रण की स्वतंत्र भूमिका
सध्याच्या राजकीय स्थितीत आपण नेहरू किंवा गांधी कुटुंबाकडून नियंत्रित केले जात नाहीत, असा स्पष्ट संदेश खरगे यांना लोकांमध्ये द्यावा लागेल. अन्यथा ते केवळ नावाला अध्यक्ष झाले आहेत आणि सत्ता दुसऱ्या कुणाच्या तरी हातात आहे, असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. अशी प्रतिमा बनू न देण्यासाठी खरगे यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. असं करत असताना गांधी कुटुंबासोबत संघर्ष उद्भवणं काँग्रेसला परवडणारं नाही.

विरोधकांची एकजूट
काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय देशात विरोधी गट तयार होऊ शकत नाही, असा विश्वास काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणे खरगे यांचाही आहे. अध्यक्ष बदलल्याने आता पक्षाची गतिशीलताही बदलली आहे. काँग्रेस पक्ष एकीकडे अस्तित्वाची लढाई लढत असताना, अनेक प्रादेशिक पक्ष आशेचा किरण ठरत आहेत. त्यामुळे संबंधित पक्षातील मतभेद मिटवून विरोधकांमध्ये एकजूट निर्माण करण्याचं आव्हान खरगे यांच्यासमोर असेल. दरम्यान, खरगे यांना अनेक कळीच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांसारख्या प्रादेशिक नेत्यांना निमंत्रित करून त्यांना नेतृत्वाची भूमिका द्यावी लागेल. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

संघटनात्मक सुधारणा
पक्षाअंतर्गत संघटनात्मक सुधारणा करणे, हे खरगे यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) निवडणुकीसाठी ते पुढे सरसावतील का? हा पहिला प्रश्न आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार CWC मध्ये, पक्षाध्यक्ष, संसदेतील काँग्रेस पक्षाचा नेता आणि इतर २३ सदस्य असणं गरजेचं आहे. यातील १२ सदस्य हे AICC कडून निवडून द्यावे लागतात.

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेमुळे संघाचीही भाषा बदलू लागली! – काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांचे मत

त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) साठी निवडणूक, संसदीय मंडळाच्या यंत्रणेचं पुनरुज्जीवन आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटांचा निर्णय घेणारी वास्तविक केंद्रीय निवडणूक समितीची स्थापना करावी लागेल, या जी-२३ गटातील नेत्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. या गटातील नेत्यांनी आधीच खरगे यांना पाठिंबा दिला आहे.

तरुण आणि दिग्गज नेत्यांमधील दरी कमी करणे
पक्षातील तरुण आणि दिग्गज नेत्यांमधील दरी कमी करणे, हे खरगे यांच्यासमोरील मोठं आव्हान आहे. एआयसीसीचे उमेदवार म्हणून खरगे यांच्याकडे पाहिले जात होतं. यामुळे AICCमधील सर्व वयोगटातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पण तरुण आणि दिग्गज नेत्यांमधीलल दरी अनेक राज्यांमध्ये दिसून येते. विशेषत: राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मागील काही वर्षांपासून वाद धुमसत आहे.

हेही वाचा- राहुल गांधींनी निकाला आधीच गांधी घराण्याची पसंती खरगे असल्याचे अप्रत्यक्षपणे केले होते सूतोवाच

केवळ राजस्थानच नव्हे तर केरळ, तेलंगणा, गोवा, दिल्ली आणि पंजाब यांसारख्या राज्यांमध्येही असा वाद सुरू आहे. शशी थरूर यांच्या उमेदवारीमुळे काही तरुण नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन तरुण आणि दिग्गज नेत्यांमधील दरी कमी करण्याचं प्रमुख आव्हान खरगे यांच्यासमोर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 main challenges before new congress president mallikarjun kharge rmm