यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. सात विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसमध्ये ८२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्षनिरीक्षक डॉ. नितीन राऊत यांनी या मुलाखती घेतल्या. काँग्रेसमध्ये सर्वाधिक इच्छुक उमरखेड मतदारसंघात असून सर्वात कमी इच्छुक दिग्रस मतदारसंघात आहेत.
जिल्हा कॉग्रेस कमिटी कार्यालयात पार पडलेल्या मुलाखतींमध्ये सहभागी इच्छुकांनी आपण काँग्रेससाठी कसा योग्य उमेदवार आहो, हे सांगितले. पक्षनिरीक्षक राऊत यांनी यवतमाळचे पालकमंत्रिपद भूषवलेले आहे. त्यामुळे त्यांना येथील काँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे मुलाखत देणाऱ्यांची राऊत यांच्या प्रतिप्रश्नांचे उत्तरे देताना दमछाक झाली.
हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?
सर्वाधिक २१ इच्छुकांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. येथील माजी आमदार विजय खडसे यांच्यासह त्यांचा मुलगा प्रज्ञानंद खडसे यांनीही मुलाखत दिली. या मतदारसंघातील इच्छुकांमध्ये स्थानिकांसह यवतमाळ, मुंबई, नांदेड आदी ठिकाणचे रहिवासी असलेल्या इच्छुकांनीही गर्दी केली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे, हे विशेष. त्या खालोखाल वणी विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवार इच्छुक आहेत. यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह त्यांचे पुतणे प्रकाश कासावार यांनीही मुलाखत दिली. हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणार?
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून १५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासह प्रज्ञा पुरके यांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघात १४ इच्छुक उमेदवार आहेत. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, बाळासाहेब मांगुळर अशी मोठी नावे आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात केवळ आठ जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे व अन्य इच्छुकांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गात असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात केवळ तीन इच्छुक उमेदवार आहेत. यात डॉ. मोहम्मद नदीम यांच्यासह दोघांचा समावेश आहे. तर विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्यासह अन्य एकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. हा मतदारसंघसुद्धा खुला आहे. मात्र येथून निवडणूक लढण्यासाठी फारजण इच्छुक नसल्याचे चित्र आहे. पुसद आणि दिग्रस हे दोन्ही पारंपरिक बंजाराबहुल मतदारसंघ आहेत. येथे बंजारा समाजाचा उमेदवारच सत्ताधारी आमदारांना आव्हान देऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने येथे पक्षाकडून आणखी चाचपणी होण्याची शक्यता आहे.
राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. यामुळे जास्तीत जास्त जागा काँग्रेस लढणार आहे. उमेदवारी देताना ‘विजयाची क्षमता’ तपासली जाणार आहे. – डॉ. नितीन राऊत, निरीक्षक काँग्रेस.