जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी त्यांच्या प्रकृतीबाबात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देत, पुन्हा सक्रीय राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कर्नाटकामधील जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळव्यात त्यांनी हे विधान केले. त्यांनी सांगितलं की, मी सक्रीय राजकारणात परत येत आहे आणि पक्षाला सक्रीय आणि बळकट करण्यासाठी तयार आहे.

जेडी (एस) कार्यकर्त्यांसाठी आयोजित “जनता मित्र” कार्यक्रमास संबोधित करतानान, ८९ वर्षीय देवेगौडा यांनी म्हटले की, “देवाच्या कृपने मी आपल्या लोकांसाठी आणखी काही काळ लढेन. मी कुमारस्वामी यांच्या पाठीशी उभा राहीन. या महिन्याच्या १८ तारखेला कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. पक्षाला वाचवण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करतो. पक्षाने कोणावरही अन्याय केलेला नाही.”

देवेगौडा यांची प्रकृती महिनभरापूर्वी खालावली होती. त्यांनतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सिद्धरामय्या यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं होतं.

या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी २२ सप्टेंबर रोजी स्वत:च्या तब्येतीबद्दलच्या अफवा रोखण्यासाठी एक निवेदन जारी केले होते, ते म्हणाले होते की ते बरे आहेत परंतु सक्रीय राजकारणात परतण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.

“माझी तब्येत आता ठीक आहे आणि मी पक्षाच्या कामात सक्रीयपणे सहभागी होणार आहे. मला आरोग्याच्या काही समस्या होत्या आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. मी आणखी काही काळ घरीच राहीन.” असे देवेगौडा म्हणाले होते.

Story img Loader