कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक यांनी नाराजी नाट्यावर मात करीत सर्वसमावेशक प्रचाराला सुरुवात केली असताना तिकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्यावर मित्रपक्षांच्या नेत्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय रसायन खत मंत्रालयाचे संचालक संजय पाटील यांनी बोलावणं आल्याशिवाय नाही असे म्हणत थेट प्रचार करणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे. खेरीज, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घरात उमेदवारी मिळाली नसल्याने नाराजी आहे. विकास कामांच्या निधीवरून गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाडगे यांच्याशी वाद झडला आहे. त्यामुळे साखर कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्या मातब्बराची नाराजी दूर करणे हे माने यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. फार काळ लांबलेले हे प्रकरण अखेर अलीकडेच निवळले आहे. कोल्हापुरात संजय मंडलिक व हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांना पुन्हा रिंगणात उतरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. धनुष्यबाण खांद्यावर घेऊन दोन्ही खासदारांनी प्रचाराला सुरुवात करताना नमनालाच नाराजी नाट्याला सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
कोल्हापूर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक यांच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. अखेरीस काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रचाराला लागू असे आश्वस्त केले. मंडलिक यांच्या प्रचाराची गाडी आता वळणावर आली आहे. तिकडे हातकणंगलेमध्ये अस्वस्थ करणारे चित्र अजूनही कायम आहे. खासदार माने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इचलकरंजी भाजप कार्यालयात झालेल्या खाजगी बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या वेळीच कार्यकर्ते, नागरिक दिसले का? अशी विचारणा करीत लोकसंपर्काच्या अभावावर टीकेची झोड उठवली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी वादाचे प्रकरण अधिक चिघळणार नाही याची दक्षता घेतल्याने वादळ पेल्यातच शांत झाले असले तरी कार्यकर्त्यांअंतर्गत खदखद कायम आहे.
जुन्या वादाला फोडणी
दुसरीकडे भाजप – महायुती यांच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी पुन्हा उफाळून येऊ लागली आहे. ती दिसत असली तरी याक्षणी माने यांच्या गोटात नाराजांना बेदखल ठरवले जात आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशारा केला की सारे प्रचारात दिसू लागतील अशी त्यांची अटकळ आहे. २००४ साली राष्ट्रवादीच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले मयूर सहकार समूहाचे नेते संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न यावेळी केला होता. महायुतीची उमेदवारी धैर्यशील माने यांना मिळाली आहे. ज्या माने घराण्याविरोधात निवडणूक लढवली त्याच घराण्याच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ पाटील (तसेच आवाडे पितापुत्रही) यांच्यावर आली आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
खासदार माने यांनी शिरोळ तालुक्यात कोणत्याच प्रमुख नेत्यांची भेट घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून पाटील यांनी सन्मान मिळणार नाही तोवर प्रचार करणार नाही, असा इशाराच मेळावा घेऊन दिला आहे. त्यांनी माने यांच्यावरील नाराजीला तोंड फोडले आहे. अर्थात, ही कृती म्हणजे संजय पाटील यांचे धैर्यशील माने यांच्यावरील नाराजी की मागील पराभवाची सल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा – शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान
साखर सम्राटांचे दुखणे
इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांच्यासाठी तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या उमेदवारासाठी प्रयत्नात होते. आवाडे तर अजूनही उमेदवारीचे कोठे जुळते का याचा अंधुक शोध घेत आहेत. दोघांचेही प्रयत्न सार्थकी ठरले नाहीत. या दोन्ही घराण्यांचे माने घराण्याशी फारसे सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. अजूनही ही दोन्ही प्रमुख घराणी प्रचारापासून तशी अलिप्त आहेत. गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे आणि खासदार माने यांच्यात विकास कामांच्या निधीवरून निवडणुकीच्या काळात वाद झाला होता. एकेकाळी या दोन्ही घराण्यात कोण जिव्हाळा होता पण साखर कारखाना उभारणीवरून तोंडे कडू झालीत ती कायमची. निवडणुकीला सामोरे जात असताना या प्रमुख घराण्यांचा हा वाद मिटवणे हे माने यांच्यासमोर आव्हान असणार आहे. किंबहुना ऊस आंदोलनाचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांच्याशी सामना करीत असताना माने यांना जवाहर, शरद व गुरुदत्त या तिन्ही कारखान्यांचे नेतृत्व करणारे अनुक्रमे आवाडे, यड्रावकर, घाटगे यांच्याबरोबरच वारणा कारखान्याचे नेते विनय कोरे या साखर सम्राटांना प्रचारात कितपत सक्रिय करतात यावर बरेच काही अवलंबून आहे.