सांगली : पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मतदारसंघ असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये कालपरवापर्यंत खाडे यांची सावली म्हणून वावरत असलेल्या प्रा. मोहन वनखंडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यापेक्षा २५ हजारांहून कमी मतदान झाल्याने मंत्री खाडे यांची कोंडी पक्षातूनच होत असल्याचे दिसत असून उमेदवारीच्या लढ्यात हा चक्रव्यूह खाडे कसे भेदतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालकमंत्री खाडे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवले. अगोदर त्यांनी भाजपकडून जत विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर मिरज मतदारसंघ राखीव झाला. मिरज मतदारसंघ राखीव होताच, खाडे यांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला. २००९ मध्ये झालेल्या मिरज दंगलीनंतर मिरजेचे प्रतिनिधित्व खाडे करत असून ज्येष्ठत्वावरून त्यांना मंत्रीपदाची आणि पालकत्वाची संधी मिळाली. मात्र, ही संधीच त्यांना अडचणीची ठरते की काय अशी स्थिती सध्या निर्माण होऊ लागली आहे. त्यांचे आतापर्यंतचे निवडणुकीतील राजकारण हे भाजपपेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वादातून उभे राहात गेले. याचा परिणाम म्हणून भाजपला महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळत गेले.

हेही वाचा – दोन पराभवांनंतर राजू शेट्टी यांची राजकीय वाटचाल आव्हानास्पद

जतपासून प्रा. वनखंडे यांनी त्यांची साथ संगत केली. आमदार असल्यापासून खाडे यांच्या निवडणुकीतील मोर्चेबांधणीपासून ते विविध कार्यक्रमाचे नियोजन करणे, प्रशासकीय कामांना गती देणे, सामाजिक कामाचे नियोजन करणे आदी कामे स्वीय सहायक या नात्याने वनखंडेच पुढाकार घेऊन करत होते. मात्र, खाडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि राम-लक्ष्मणाच्या जोडीत दुरावा पडत गेला. भाजपचे मिरज विधानसभा प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी वनखंडे यांच्यावर पक्षाने सोपवली होती, तर अनुसूचित जाती जमाती सेलचे ते सरचिटणीस म्हणून भाजपमध्ये कार्यरत आहेत. पालकमंत्री व त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांच्या विधानसभा प्रचारप्रमुख पदावर गदा आली. त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. निर्णय प्रक्रियेपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आले असले तरी त्यांचा गेल्या दीड दशकापासूनच पक्षातील अन्य नेत्यांशी असलेला संवाद मात्र कायम राहिला असून या जोरावर आणि मतदारसंघात असलेल्या संपर्काच्या ताकदीवर वनखंडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांच्या या मागणीला पक्षाकडून कितपत प्रतिसाद मिळतो हे जरी गुलदस्त्यात असले तरी लोकसभा निवडणुकीत दिसून आलेली खराब कामगिरीही मोजली गेली आणि उमेदवार बदलाचा जर पक्षाने निर्णय घेतलाच तर वनखंडे यांच्या नावाचा विचार केला जाणार का हाही प्रश्‍न आहे. तरीही मंत्री खाडे यांना पक्षातूनच आणि तेही एकेकाळच्या निकटच्या सहकार्‍याकडून आव्हान दिले जात असेल तर भाजपमध्येही अस्वस्थता ठासून भरली आहे आणि याच्या मूळाशी लोकसभेत भाजपचा झालेला पराभव महत्वाचे असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा – मुंबई पदवीधरमध्ये चुरशीची लढत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री खाडे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर प्रा. वनखंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसादिवशी धुतलेले हात वाळतात न वाळतात तोच दुसर्‍या दिवशी मंत्री खाडे यांचा वाढदिवस साजरा झाला. यातून एकमेकांना शह देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न झाला. एकमेकांची ही खडाखडी विधानसभेच्या मैदानापर्यंत टिकणार का या साशंकतेने दोन्ही घरचे पाहुणेही पाहण्यास मिळाले. आता रणमैदानात हलगी वाजू लागली आहे. हा चक्रव्यूह पालकमंत्री खाडे कसा भेदतात हे पाहणेही रंजक ठरणार आहे.