नितीन पखाले
यवतमाळ : राज्याला दोन मुख्यमंत्री देणारे पुसद शहर आजही विकासापासून कोसो दूर आहे. कधीकाळी कृषी, शिक्षण, सहकार यात आघाडीवर असलेले हे शहर आता या क्षेत्रातही माघरले आहे. मात्र पुसद शहराचे तारणहार आणि विकासाची दृष्टी असणारे फक्त आम्हीच आहोत, असा दावा महायुतीत सहभागी असलेले या भागातील खासदार आणि स्थानिक आमदार यांच्याकडून होत आहे. पुसद शहरातील बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा योजनेसाठी आपणच पाठपुरावा करून निधी आणल्याचा दावा खासदार भावना गवळी (शिवसेना शिंदे गट) आणि आमदार इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांच्याकडून केला जात आहे. सत्ताधारी आमदार, खासदारातच समन्वय नसल्याचे या प्रकाराने पुढे आले आहे.
पुसद शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून १४ डिसेंबरला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६७ कोटी ६० लाखांचा निधी शासनाने मंजूर केला. हा निधी मंजूर होताच खासदार भावना गवळी यांच्या वतीने प्रसिध्द पत्रक काढण्यात येऊन, त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला. गवळी यांच्या समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी या योजनेचे श्रेय लागणारे फलक लावून खा. गवळी यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा… आमदार रोहित पवार यांची अजित पवार आणि भाजपकडून पद्धतशीर कोंडी ?
पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनीही शुक्रवारी प्रसिद्धीपत्रक काढून ही योजना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाली असा दावा केला. आ. नाईक यांनी पुसद येथे पत्रपरिषद घेतली आणि या योजनेच्या पाठपुराव्यासाठी केलेल्या पत्रांची फाईलच पुरावा म्हणून सादर केली. या योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनी असे पुरावे सादर करावे, असे आव्हानही आ. इंद्रनील नाईक यांनी खासदार भावना गवळी गटाला अप्रत्यक्षपणे दिले. आपण मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या योजनेच्या मंजुरीसाठी व निधीसाठी पाठपुरावा केला, असे आमदार इंद्रनील नाईक म्हणाले. शहराच्या विकासासाठी आपण १०० कोटी आणले व आणखी १०० कोटी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या पाणीपुरवठा योजनेच्या निधीचे श्रेय केवळ माजी मंत्री मनोहर नाईक, नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे व आपल्यालाच असल्याचे, आ. नाईक म्हणाले. पुसद शहराचा विकास करण्यासाठी निधी आणण्याची क्षमता आपल्यातच असून आपल्याला निवडणुकीत कोणीही पराभूत करू शकत नसल्याचा दावाही आमदार इंद्रनील नाईक यांनी यावेळी केला.
हेही वाचा… अजितदादा गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची निवडणूक तयारी सुरू
दरम्यान, पुसद नगर परिषदेची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणण्याचे श्रेय खासदार भावना गवळी व आपलेच आहे, असा दावा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केला आहे. आपण स्वतः नगर परिषदेत पाणीपुरवठा सभापती असताना या योजनेच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून वीज देयकांमध्ये बचत होण्यासाठी एक कोटी ५० लाख रुपयांच्या सौर ऊर्जा युनिटचा समावेश केला व सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केला, असा दावा पापीनवार यांनी केला आहे. खासदार भावना गवळी व आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केल्यानेच या योजनेला मंजुरी मिळाली, असे पापीनवार यांनी म्हटले आहे. जनता पाण्यासाठी तहानलेली असताना पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादाची ही लढाई शहरात चांगलीच चर्चेत आली आहे. योजनेचे श्रेय कोणीही घ्या, पण तहानलेल्या पुसदकरांना पाणी पाजा, अशी चर्चा नागरिकांत आहे.