भाईंदर : मिरा-भाईदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन यांना रोखण्यासाठी भाजपमधील एक मोठा गट सक्रिय झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेल्या काही काळापासून सलगी करणाऱ्या जैन यांना उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षातील स्थानिक नेत्यांनी आयोजित केलेला संकल्प मेळावा सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी मिरा-भाईदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला होता. शहराच्या माजी महापौर असलेल्या जैन या मुळच्या भाजपच्या असल्या तरी त्यांचे आणि नरेंद्र मेहता यांचे विळ्याभोपळ्याचे नाते राहिले आहे. निवडून आल्यावर सुरुवातीपासून जैन यांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली. सुरुवातीला महाविकास आघाडीला आणि त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेची साथ करताना त्यांनी पक्षाच्या सहयोगी आमदार पद स्वीकारले. भाजप श्रेष्ठींना जैन यांचा हा निर्णय फारसा रुचला नाही. शिंदे सेनेचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मिरा-भाईदर शहरात आक्रमक राजकारण सुरु केले आहे. त्यांचे आणि नरेंद्र मेहता यांचेही फारसे पटत नाही. गीता जैन यांच्या रुपाने सरनाईक यांनाही या शहरात बळ मिळाल्याने शहरात सध्या भाजप विरुद्ध शिंदे यांची शिवसेनेत टोकाची स्पर्धा सुरु आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या शहरातून जैन यांना शिवसेनेकडून (शिंदे) उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सध्या जोर जावला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनीही शहरात संकल्प सभा आयोजित करत जैन यांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

हेही वाचा – हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे ‘शिट्टी’ चिन्ह धोक्यात

रविंद्र चव्हाण – शिंदे असा सामना ?

भाजपचे मिरा-भाईदर शहराचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा आणि माजी आमदार नरेंद्र मेहता हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. मेहता यांचे नाव पुढे करताना किशोर शर्मा यांनी येत्या रविवारी शहरात संकल्प सभेचे आयोजन केले आहे. हा संकल्प सोडताना संकल्प परिवर्तनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेनेच्या (शिंदे) सहयोगी आमदार असलेल्या जैन यांना हा एकप्रकारे इशारा मानला जात आहे. जैन यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा प्रयत्न आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मात्र मेहता यांच्यासाठी जोर लावल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली असून यामुळे शहरातील उमेदवारीची स्पर्धा शिंदे-चव्हाण यांच्यातच रंगल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : मुरबाडमध्ये कथोरेंच्या अडचणींमध्ये वाढ

आपला हाच दावा प्रबळ करण्यासाठी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी २० ऑक्टोबर रोजी भाईंदरच्या लोटस मैदानात ‘संकल्प सभेचे’ आयोजन केले आहे. यात शहरातील स्थगित विकास कामांना पूर्वत्वाकडे घेऊन जाण्याच्या दुष्टीने ही सभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टाने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी नेते नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेतली जाणार आहे. – किशोर शर्मा, जिल्हाध्यक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A large group in bjp has become active to stop sitting mla of mira bhayandar assembly constituency geeta jain print politics news ssb