भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था तसेच होणाऱ्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन जिल्हा पोलीस प्रशासन सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनावरून आता अंतिम हात फिरवत असून भारतयात्रींच्या नांदेड जिल्ह्यातील चार दिवसांच्या मुक्कामादरम्यान ३ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ पोलीस उपअधीक्षक, ७१ निरीक्षक, २७४ फौजदार व सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार ५१० पुरुष पोलीस कर्मचारी २८० महिला यांशिवाय १ हजार २०० गृहरक्षक वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तावर राहणार आहेत.
हेही वाचा- राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’त रायगडच्या नंदा म्हात्रेंचा सहभाग
नवे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी येथे रुजू झाल्यानंतर बंदोबस्ताचा आढावा घेतला. यात्रेत शरद पवार सहभागी होणार आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोणते नेते सहभागी होणार हे अद्यापि अधांतरीच आहे. एका बाजूला प्रशासनाचीही धावपळ सुरू असतानाच आता काँग्रेसचे प्रभारी एच. के पटेल यांनी नुकतीच यात्रेतील मुक्कामस्थळांची पाहणी केली. ‘भारत जोडो’ यात्रा सोमवारी देगलूरला पोहोचत आहे. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील तयारी व एकंदर व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर राज्याचे प्रभारी एच. के. पाटील नांदेड, हिंगोली ते बुलढाण्यापर्यंतच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. देगलूरहून ते नांदेडला येऊन पोहोचल्यानंतर त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व अन्य स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत येथे एक बैठक पार पडली.
हेही वाचा- ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतांवर भाजपाचा डोळा
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे काही सहकारी नांदेड जिल्ह्यातील पदयात्रेत काही काळ सहभागी होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अशोक चव्हाण व इतर नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले होते; पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यात्रेमध्ये कोण सहभागी होणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनता दलाचे स्थानिक नेते यात्रेचे स्वागत करणार असल्याचे माजी आमदार गंगाधरराव पटने यांनी स्पष्ट केले.राहुल गांधी यांच्या या यात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देगलूरला आगमन झाल्यानंतर तेथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने भारत यात्रींचे स्वागत केले जाणार आहे. या वेळी प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे समन्वयक बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मोहन जोशी या प्रमुख नेत्यांसह अन्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तेथे हजर राहणार आहेत.
देगलूर नगर परिषदेसमोर यात्रेचे स्वागत झाल्यानंतर राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांचा तेथे मुक्काम राहील. मंगळवारी सकाळी देगलूरहून पदयात्रा सुरू होईल. त्या दिवशी यात्रेचा मुक्काम बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे राहणार आहे. बुधवारी ही यात्रा नरसी, नायगावमार्गे कृष्णूर एमआयडीसीपर्यंत येईल. त्या परिसरातच तिसरा मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी यात्रेचे नांदेड शहरात आगमन होईल. त्याच दिवशी सायंकाळी नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ११ तारखेला ही यात्रा अर्धापूर, पार्डी मक्तामार्गे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होईल.