संजीव कुळकर्णी
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते शरद पवार यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री व आमदार, जुन्या पिढीतील केशवराव धोंडगेंसारखे नेते ज्यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या कार्यक्रमास हजेरी लावतात त्या कमलकिशोर कदम यांची नक्की ओळख काय ? कमी कालावधीसाठी शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेला नेता, की आयआयटी पवईमधून शिक्षण घेतल्यानंतर स्वत:ला राजकारणात झोकून देणारा; आणि नंतर शैक्षणिक संकुले उभी करुन शरद पवार यांच्या संस्थात्मक राजकारणाला पाठबळ देणारा नेता?
कमलकिशोर कदम वयाच्या २७ व्या वर्षी राजकारणात आले. खरे तर आयआयटी पवई येथे अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर उद्योग, किंवा चांगल्या हुद्दयाची नोकरी त्यांना करता आली असती; पण तसे झाले नाही. १९७० ते १९८० हे ‘चळवळीचे दशक’ म्हणून ओळखले जाते. याच काळात मराठवाडा विकास आंदोलनात ते सक्रिय झाले. १९७२ मध्ये नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात एक एक ‘कदम’ टाकत त्यांचा प्रवास सुरू झाला. तोपावेतो नांदेडच्या राजकारणावर शंकरराव चव्हाण-श्यामराव कदम या बिनीच्या जोडीचा आणि त्यांच्या अनुयायांचा प्रभाव होता. नवखे कमलकिशोर यांनी श्यामरावजींचे बोट धरूनच राजकीय मैदानावर पहिले पाऊल टाकले. प्रारंभीच्या काळात शंकरराव हेच त्यांचे नेते होते; पण पुढे काही वर्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागला. १९७८ साली शरद पवार यांनी आपला वेगळा गट करून त्या वेळच्या जनता पक्षाच्या सहभागाने ‘पुलोद’ सरकार स्थापन केल्यानंतर मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांना जे आश्वासक सहकारी गवसले, त्यांत कमलकिशोर कदम हे नांदेड जिल्ह्यातील एक आघाडीवीर होते. यानिमित्ताने पवारांना मराठवाड्यात एक उच्चविद्याविभूषित सहकारी मिळाला.
१९६२ पासूनच्या चार निवडणुकांत नांदेडमधून मुस्लीम उमेदवार विधानसभेवर जात होता. ही परंपरा खंडित करण्याची नोंद कमलकिशोर कदम यांनी १९८० साली आपल्या नावावर केली. या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला विशेषतः शंकरराव चव्हाणांना मोठा धक्का दिला. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाणविरोधी गटाची पायाभरणी तेथूनच झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही शंकरराव विरुद्ध शरद पवार असे चित्र निर्माण झाले. आमदार झाल्यानंतर कमलकिशोर कदम यांचे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. औरंगाबादच्या तत्कालीन मराठवाडा विद्यापीठामध्येही एक प्रभावी गट होता. या गटात गंगाधर पाथ्रीकर, वसंत काळे, ज्ञानोबा मुंडे यांच्यासोबत कदम यांचेही नाव ठळक झाले. या पुढचा कदम यांचा प्रवास संस्था उभा करण्याचा होता.
१९८०-९० या दशकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात विनाअनुदानित तत्त्वावरील खाजगी अभियांत्रिकी-तंत्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे धोरण त्यावेळच्या शासनाने आणले. या काळात आमदार असलेल्या कमलकिशोर यांनी औरंगाबादेत जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रातील आपला प्रवास सुरू केला. कदम यांना ८८ साली मंत्रिपदाची संधी मिळाली. शालेय तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कारभार त्यांच्या हाती होता. तत्पूर्वी १९८५ साली त्यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. १९९० नंतर वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पहिले अध्यक्ष कमलकिशोरच होते.
कदम यांनी शिक्षण- आरोग्य क्षेत्रात संस्थात्मक कार्यतून उभा केलेला अवाढव्य पसारा नवी बांधणी करणारा होता. पण त्या संस्थांमधून हक्काचा मतदार उभा रहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच झाले नाहीत. (परिणामी १९९० आणि १९९५ या दोन्ही विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभवच झाला.) राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर काँग्रेसचे व सध्याचे मंत्री अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व कायम राहिले. २०१४ पासून भाजपनेही या जिल्ह्यात मोठे यश मिळविले; पण राष्ट्रवादीचे गाडे काही पुढे सरकले नाही.
कमल किशोर कदम यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू फक्त शरद पवार. त्यांचे सूर अजित पवार किंवा त्यांच्या समकालीन नेत्यांशी कधी जुळल्याचे जाहीरपणे दिसले नाही. पक्ष संघटनेच्या बांधणीत कमलबाबूंचे योगदान किती या प्रश्नाच्या उत्तरापेक्षाही संस्थात्मक जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान हे अधिक महत्वाचे. महात्मा गांधी मिशनची दोन विद्यापीठे व अनेक शैक्षणिक संकुले, त्यातील गुणवत्ता वाढीसाठी होणारे प्रयत्न हे सारे नव्या पद्धतीने बांधणी करणारे असल्याने कमलकिशोर कदम पवारांसाठी महत्वाचे ठरले. संस्थात्मक राजकारणाला प्रोत्साहन देणारा पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा निर्माण करण्यात दिलेल्या योगदानात कमलबाबूंचे नाव महत्वपूर्ण मानले जाते.