खरं तर ‘जय महाराष्ट्र’ या शब्दाचं वजन किती राहिलं आहे, माहीत नाही. पण तुमच्याशी बोलायचं तर हा शब्द हवाच. आता कोण कोणाचा जय करतोय तेच कळत नाही आणि त्यात ‘आता कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न कोणी विचारुच नये एवढा शक्तिपात झाला आहे, तेव्हा तुमची आठवण येणं स्वाभाविक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही गावागावांतील प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळवून देणारे. भले, १९९० च्या दशकात फारसे शिकलेले नव्हते तुमच्या बरोबर, पण धग होती, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची. त्यामुळेच कोणी रॉकेलचे विक्रेते, पानठेला चालविणारे किंवा रिक्षा चालविणारे आमदार झाले. राजकीय व्यवस्थेत घट्ट पाय रोवून उभारण्याची ताकद तुमच्यामुळे मिळाली महाराष्ट्राला. ‘दिवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन जेवढा आवडायचा ना त्यापेक्षाही अधिक तुम्ही आवडायचे. ‘शिवसेनाप्रमुख’ या पाच अक्षरांभोवतीचा आदर वाढला. कारण गावागावांत सर्वसामान्य माणसाच्या हातात सत्तेची चावी दिली तुम्ही. भिडायचे, ही ताकद येते कोठून ‌? शिवसेना या फलकावर किती प्रेम होतं तरुणांचं ? बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना ही अक्षरं लिहिलेला फलक फाडला. मग एक शिवसैनिक काँग्रेसच्या पुढारी ज्या विश्रामगृहात बसले हाेते तेथे गेला. तो त्यांच्या तोंडावर थुंकला. पुढे या तरुणाला आमदार होता आले. पुढे राजकीय लढा असा लढायचा नसतो हे त्याला कळालं. तेव्हा सर्वसामान्य म्हणून तुम्ही उभी केलेली माणसं प्रस्थापित झाली. देणगी- वर्गणीचे गणित जुळवत म्हणा किंवा छोटं- मोठं टेंडर घेऊन म्हणा काही शिवसैनिकांनी ‘फॉर्च्युनर‘ घेतल्या. गाड्या-घोड्या वाढल्या. गावागावांत वाघाचं चिन्ह लावून हातात अनेक गंडे- दाेरे बांधले आणि नेत्याला गुडघ्यात न वाकता नमस्कार केला की शिवसैनिक होता येतं, हे सूत्र बनत गेलं, रुजलं. पण काही जिल्ह्यात काही जणांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे सूत्र जपलं. तशी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे तुम्हीही पाहिले.

हेही वाचा : राम मंदिरामुळे देशातील राजकारण बदलणार? विरोधकांपुढे आव्हान काय?

पण आता शिवसेना हा पक्षच पळवला गेला. बाळासाहेबांची शिवसेना कोणती याचा वाद न्यायालयात गेला. उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण सोडावा लागला. हातात मशाल घेतली त्यांनी. पण बाळासाहेब ती धग संपली आहे, याची सल, बोच मात्र राजकीय व्यवस्थेत आहे. अर्थात स्वार्थीपणे त्यावर पांघरुण घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पूर्वी मोठा भाऊ म्हणून भाजपमधील बडे पुढारी ‘मातोश्री’ वर यायचे, बोलायचे. संख्या बदलली आणि चित्र पालटले. आता आर नाही तर पार, एक घाव दोन तुकडे अशी विचारांची कार्यपद्धतीही बदलत गेली. पाकिस्तान खेळणार म्हणून खेळपट्टी उखडून टाकणारा कार्यकर्ता राहिला नाही आणि ती गरजही उरली नाही. पण सरळपणे काम करणाऱ्यांना नोकरशाहीसुद्धा वेड्यात काढत असते. सत्तेची गणिते जुळवून अगदी घरगुती संवाद करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राला भावले. पण शिवसेनेची प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याची धग मात्र हळुहळु आटत गेली. आता व्यवस्था विरोधाचा दुष्काळ आहे. आता कोणी शिवसैनिक जाब विचारत नाही आणि कोणी जाब विचारल्याचे दाखवले तरी ते एक नाटक आहे, हे सर्वसमांन्यांनाही कळून जातं.

हेही वाचा : कोल्हापूरमध्ये भाजपच्या दाव्याने पेच, शिंदे गटाची कोंडी

‘हिदूहृदयसम्राट असा शब्द उच्चारल्यानंतर निर्माण होणारा आदर मराठवाड्याने तर कमालीचा जपला. वाढवला, जोपासला. कारण व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार देणारी माणसं तुम्ही राजकीय व्यवस्थेपर्यंत नेली. पुढे तीही प्रवाहपतीत झाली. पण अशी ताकद उभी राहू शकते, हे दाखवून देणारे तुम्ही एकटेच होतात. सत्ता म्हणजे पैसा आणि फक्त पैशातून सत्ता निर्माण करता येते, या सूत्राला तुम्ही दिलेला छेद विसरता येत नाही. म्हणून ‘जय महाराष्ट्र’ म्हणावे असे तुम्हीच शेवटचे. आता ‘जय महाराष्ट्र’ म्हणणारे गावागावांत अनेकजण आहेत. पण त्यांना बळ देणारा चमू बदलला आहे. तुमच्या काळात काही मोजक्याच जणांकडे असणारी ‘धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म’ ही पुस्तिका अनेक जणांकडे पोहोचावी असे प्रयत्न सुरू आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांवर शिवसैनिकांनी यावे, अशी सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा सांगत आहे. ज्यांनी कधी शिवसेनेत काम केलेच नाही, अशी माणसं शिवसेनेला नवा आकार देऊ लागली आहेत ,महाराष्ट्रातील ‘पुरोगामी’ माणूस आाता गालातल्या गालात हसत उद्धव ठाकरे विषयी ममत्व भाव बाळगू लागला आहे. शिवसेनेचे नाव सरकार बरोबर जोडले तर गेले आहे पण बाळासाहेब शिवसेनेच्या ‘जय महाराष्ट्र’ मधील धग संपली आहे.
एवढंच सांगायचंय साहेब ,
पुन्हा एकदा ‘जय महाराष्ट्र’!

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A letter to balasaheb thackeray after the split in shivsena print politics news css