महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राज्य काँग्रेससाठी आता नवीन प्रभारी नेमावा लागणार आहे. एच. के. पाटील यांनी यापूर्वी सहकार खाते भूषविले होते. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाटील यांचा समावेश करण्यात आला. काँग्रेसमध्ये शक्यतो एक व्यक्ती, एक पदाचे सूत्र अंमलात आणले जाते. कर्नाटक काँग्रेसमध्ये पाटील हे ज्येष्ठ नेते असले तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत तसे ते अनुनभवी होते.
काँग्रेसमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी आतापर्यंत केंद्रातील ज्येष्ठ नेत्याकडे सोपविली जात असे. त्यात जी. के. मूपनार, माधवराव शिंदे, वायलर रवी, मार्गारेट अल्वा, मल्लीकार्जुन खरगे आदींचा समावेश होता. या तुलनेत एच. के. पाटील नवखे होते. तरीही त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कर्नाटकच्या बाहेर त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याचा अनुभवही नव्हता. गडगमधून निवडून आलेल्या पाटील यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. कारण ज्येष्ठ नेते असूनही पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळाली नव्हती.
हेही वाचा – भाजपचे मंत्री महिनाभर व्यस्त
एच. के. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राची जबाबदारी लवकरच काढून घेतली जाईल. यामुळे राज्य काँग्रेससाठी नवा प्रभारी नेमावा लागेल. मल्लीकार्जुन खरगे व एच. के. पाटील हे दोघेही लागोपाठ नेमलेले प्रभारी कर्नाटकमधील होते. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जागावाटपाच्या वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे प्रभारीपद सोपविले जाऊ शकते.