सांगली : हातकणंगले मतदार संघातील वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघात होत असलेल्या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कसोटी लागणार आहे. गतवेळी आघाडीत असलेल्या राजू शेट्टी यांना या दोन मतदार संघात मताधिक्य मिळाले होते. तसे मताधिक्य या दोन मतदार संघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील यांना मिळते का यावर आमदार पाटील यांचे या दोन मतदार संघावरील वर्चस्व ठरणार आहे. तसेच सांगलीमध्ये सुरू असलेल्या उमेदवारीच्या गोंधळाचा आणि खासदार संजय राउत यांनी शाब्दिक बाणामुळे दुखावलेला या मतदार संघातील वसंतदादा गट काय भूमिका घेतो यावर या दोन मतदार संघातील मतावर परिणाम होणार आहे.
यावेळी नेहमीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानीची उमेदवारी आहे. स्वाभिमानीचे राजू शेट्टी दिवाळीपासूनच प्रचारात आहेत. त्यामुळे त्यांनी गावपातळीवर भेटीगाठीवर भर देत असतानाच कोणत्याही राजकीय पक्षांशी अथवा आघाडी अथवा युतीला दूर ठेवतच मैदानात उतरण्याचे जाहीर केले होते. गरज असेल तर महाआघाडीने पाठिंंबा द्यावा असे सांगत आपली मै अकेला राही हूँ चा नारा दिला होता. उबाठा शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांची बोलणीही झाली होती. मात्र, मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्याचे त्यांनी अमान्य करत एकटाच मैदानात दोन हात करण्यास सज्ज असल्याचे सांगितले.
या मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, बहुजन वंचित आघाडीचे डी.सी. पाटील आणि शेट्टी हे चौघे आखाड्यात उतरले आहेत. शिवसेनेचे सत्यजित पाटील हे शिराळ्यातील चिखलीच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. यामुळे त्यांच्या पाठीशी शिराळ्यातील आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीची ताकद राहणार आहे. तर वाळव्यातून महाआघाडी म्हणून आमदार पाटील हेही त्यांच्या विजयासाठी आग्रही राहतील. मात्र, गेल्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी आघाडीतून शेट्टी यांना मदत केली होती. यामुळेच या दोन मतदार संघातून शेट्टींना मताधिक्य मिळवणे शक्य झाले होेते. मात्र, पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीकाठचा मतदार शेट्टी आणि माने या दोघांच्या उमेदवारीमुळे विभागला जाउन काही अंशी जातीयवादी लढत पाहण्यास मिळाली. यातूनच शेट्टींना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी मानेंच्या मदतीला भाजपाचेही मतदान आले होते. गत निवडणुकीत शिराळा मतदार संघामध्ये आघाडीतून शेट्टी यांना ९८ हजार ३४६ तर वाळव्यातून ९३ हजार २५० मते मिळाली होती. यामुळे या दोन मतदार संघातून शेट्टींना ३९ हजार ४७४ मतांची आघाडी मिळवता आली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शाहूवाडी व हातकणंगले मतदार संघातून पीछेहाट झाली होती.
आमदार पाटील यांचे शिराळा व वाळवा मतदार संघामध्ये वर्चस्व आहे. गेल्यावेळी शेट्टींना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता हेच काम सेनेचे सत्यजित पाटील यांच्यासाठी करायचे आहे. बदलत्या स्थितीत शेट्टी आणि माने हे विरोधक असून शाहूवाडीच्या पाटलांसाठी त्यांना मताधिक्य मिळवून देत असताना आपले वर्चस्वही सिध्द करावे लागणार आहे. आणखी चार महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने आमदार पाटील यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे.