नाशिक – नाशिकचा अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलने पोलिसांना गुंगारा देणे किती सहजशक्य आहे, हे ससून रुग्णालयातून गायब होऊन दाखवून दिल्यानंतर या प्रकरणाचे अनेक कंगोरे हळूहळू उघड होऊ लागले आहेत. ललित पाटील अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नसताना या पाटलांमुळे आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा मात्र चांगलाच उडाला आहे. नाशिक येथे स्थानिक पातळीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ललित कोणाच्या अधिक जवळचा, यावरून एकमेकांवर आरोप होऊ लागले असताना दोन्ही बाजू यात गुरफटल्या असल्याने या आरोपांची चौकशी होणे तर दूर, ते केवळ क्षणिक ठरण्याची शक्यताच अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून जाईपर्यंत आपल्या शहरातील ललित पाटील या व्यक्तीचे कारनामे नाशिककरांना माहीत असण्याचे तसे कोणतेच कारण नव्हते. नाशिकजवळील शिंदे येथील औद्योगिक वसाहतीत ललितचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जेव्हा साकीनाका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला तेव्हापासून ललितरम्य कथांची सुरू झालेली मालिका थांबण्याचे कोणतेही चिन्ह सध्यातरी नाही. प्रारंभी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालयात ललितला दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर भुसे यांनी त्वरीत त्याचे खंडन केले. या राज्यस्तरीय दोन नेत्यांमध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप नंतर नाशिकच्या स्थानिक पातळीपर्यंत पाझरले आणि ललित कोणाच्या अधिक जवळचा, याचे शोधकाम ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून सुरू झाले. या शोधकामात हाती लागलेल्या दस्तावेजासह सचित्र स्वरुपात एकमेकांवर आरोप करण्याची मालिकाच सुरू झाली. वास्तविक, स्थानिक पातळीवर एखादी व्यक्ती तिचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव दाखवत असेल तर त्याची चाहूल पोलिसांऐवजी राजकीय मंडळींना लवकर लागते. परंतु, तेव्हा अशा व्यक्तींना आपल्या पक्षात प्रवेश देताना त्याचा इतिहास, कामगिरी जाणून घेण्यात कोणत्याच राजकीय नेत्यांना रस नसतो.

हेही वाचा – राजस्थान : दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा, काँग्रेसकडून प्रयत्न; ३४ जागांवर डोळा!

हेही वाचा – मध्य प्रदेश : काँग्रेसच्या पहिल्या यादीत १९ महिला, शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात अभिनेते विक्रम मस्ताल यांना तिकीट!!

ललितने उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा दादा भुसे हेही उपस्थित असल्याचे छायाचित्ररुपी पुरावा ठाकरे गटाकडून पुढे आणण्यात आला. त्यावर तत्कालीन जिल्हाप्रमुख विनायक पांडे यांच्यामुळेच ललितचा शिवसेनेत प्रवेश झाला होता, असे प्रत्युत्तर भुसे यांनी दिले. शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांच्यासमवेतचे ललितचे छायाचित्रही शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फलकाव्दारे मिरविण्यास सुरुवात केली. या राजकीय चिखलफेकीतून आपण एकमेकांचे किती वस्त्रहरण करत आहोत, याचे भानही दोन्ही बाजूच्या राजकीय नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राहिले नाही. ललितसारखी मंडळी खरेतर राजकारण्यांपेक्षा अधिक तरबेज असतात. राजकारण्यांना निवडणुकीवेळी अशा मंडळींचा उपयोग होत असला तरी, ही मंडळीही राजकारण्यांपासून आपला कार्यभाग साधून घेत असतात. कारागृहातून आधी ससूनमध्ये दाखल होणे, नंतर तिथून अगदी आरामात चालत जात पलायन करणे, हे ललितसारख्यांना त्यामुळेच शक्य होते. ललित नेमका कुठे आणि किती दूर पळाला, हे शोधण्याचे काम पोलिसांचे. ते त्यांना करावेच लागेल. परंतु, ललितपासून दूर पळण्यात स्थानिक राजकीय मंडळींमध्ये सध्या चालू असलेली लाजीरवाणी स्पर्धा पाहून नाशिककरांना हसू येत आहे. शहराच्या विकासापेक्षा कोणत्या गोष्टींचा राजकीय मंडळींवर अधिक अंमल असतो, हेही यानिमित्ताने पुढे आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A round of accusations and counteraccusations between the ruling party and the opposition in nashik over lalit patil print politics news ssb
Show comments