उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध गुन्हेगार, राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना पोलीस बंदोबस्तातच तीन लोकांनी कॅमेऱ्यासमोरच ठार केले. यानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एके काळी इतरांवर दहशत गाजवणारे माफिया आज स्वतः दहशतीखाली आहेत.” योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनऊ आणि हरदोई जिल्ह्यात एक हजार एकरवर टेक्स्टाइल पार्क उभारण्यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशची कायदा व सुव्यवस्था सुधारत असल्यामुळे आता गुंतवणुकीसाठी कारखानदारांना आपले राज्य जवळचे वाटत आहे. या करारावर स्वाक्षरी करीत असताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयलदेखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ म्हणाले की, २०१७ आधी उत्तर प्रदेश दोन गोष्टीसाठी ओळखले जात होते. एक म्हणजे सर्वात वाईट कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यासाठी आणि दुसरे म्हणजे दंगलीसाठी. काही जिल्ह्यांचे नाव ऐकले तरी लोकांना भीती वाटायची. आता कुणालाही कोणत्याही जिल्ह्याला घाबरण्याची गरज नाही. जे लोक एके काळी उत्तर प्रदेशच्या प्रतिमेसाठी धोका निर्माण करीत होते, आज त्यांनाच धोका निर्माण झाला आहे.

अतिक आणि अशरफ अहमद यांच्यावर पोलिसांसमोरच झालेला हल्ला आणि पोलिसांच्या चकमकीत अतिकचा मुलगा असदचा झालेला मृत्यू. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात टीकेचा सूर लावला. या दोन्ही प्रकरणांची न्यायिक आणि विशेष चौकशी पथकाकडून चौकशी होणार असल्याचे योगी सरकारने जाहीर केले आहे. लखनऊ येथील कार्यक्रमात बोलत असताना आदित्यनाथ म्हणाले की, आज उत्तर प्रदेशमध्ये कोणताही माफिया दहशत पसरवू शकणार नाही. प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्याची ओळखही सुरक्षित आहे.

हे वाचा >> अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “उत्तर प्रदेशात उत्तम कायदा सुव्यवस्था…”

आता कोणताही माफिया उद्योगपतींना धमकवणार नाही!

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, दंगलीचे राज्य ही ओळख यूपी लवकरच पुसून काढेल. २०१२ ते २०१७ दरम्यान प्रत्येक तिसऱ्या दिवशी आधी इथे दंगली होत होत्या. या काळात तब्बल ७०० दंगलींची नोंद झाली. २००७ ते २०१३ दरम्यान ३६४ दंगलींची नोंद झाली. मात्र त्याच वेळी २०१७ ते २०२३ दरम्यान एकही दंगल उसळलेली नाही. एकदाही कर्फ्यू लावण्याची गरज पडली नाही. उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही अतिशय उत्तम परिस्थिती आहे. आता कोणताही माफिया किंवा व्यावसायिक गुन्हेगार उद्योगपतींना धमकवणार नाही.”

लखनऊ येथील कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, केंद्रीय हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मोहन प्रसाद आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या एमएसएमई मंत्रालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पीयुष गोयल यांच्यासह उत्तर प्रदेशचे एमएसएमई मंत्री राकेश सचन आणि केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश हे देखील उपस्थित होते.

पीएम मित्र योजनेसाठी (पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाइल) उत्तर प्रदेश राज्याला निवडल्याबाबत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या नव्या टेक्स्टाइल पार्कमुळे उत्तर प्रदेशची प्राचीन ओळख पुन्हा एकदा राज्याला लाभू शकेल. तसेच देशातला नवीन टेक्स्टाइल हब उत्तर प्रदेशमध्ये बनण्यासाठी हा करार काम करेल, असेही त्यांनी सांगितले. मागच्या सहा वर्षांत भाजपाकडून प्रयत्न केले जात असल्यामुळे राज्यात अनेक गुंतवणुकीचे प्रस्ताव येत आहे. आतापर्यंत ३५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात यश आल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A threat once mafia now themselves under threat says up cm yogi adityanath after atiq ahmad killed kvg
Show comments