धुळे – धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली असल्याने काँग्रेसच्या डाॅ. शोभा बच्छाव विरुद्ध भाजपचे डाॅ. सुभाष भामरे यांच्यातील लढत उल्लेखनीय ठरण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. या मतदारसंघात १९५२ पासून म्हणजे ७२ वर्षात केवळ सहा महिलांनी उमेदवारी केली असून एकही महिला संसदेत पोहोचली नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात धुळे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसकडून अनेक नावांवर विचार करुन उमेदवाराचा शोध माजी आरोग्य राज्यमंत्री डाॅ. शोभा बच्छाव यांच्यापर्यंत येऊन थांबला. त्यासाठी कारणही तसेच आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळे लोकसभा मतदारसंघातून गेली होती. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी याच मतदारसंघात महिलांसाठी काँग्रेसची पंचसूत्री जाहीर केली होती. प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणे, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. डाॅ. बच्छाव यांना उमेदवारी देण्याची तार या घोषणांशी जोडलेली अशीच म्हणावी लागेल. महिनाभरात काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील, समाजसेविका प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. तथापि, काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत धुळे प्रभारी तथा निवडणूक निरीक्षक डॉ. बच्छाव यांचे नाव पुढे आले.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या तीन तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पैकी धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या निर्णायक आहे. बच्छाव यांच्या पाठीशी ही मते राहतील, असा काँग्रेसला विश्वास आहे. शिवाय बच्छाव या नाशिक जिल्ह्यातील असल्याने बागलाण, मालेगाव बाह्य या मतदारसंघांमध्येही लाभ होऊ शकेल, असे काँग्रेसचे गणित आहे. २००९ मध्ये बागलाण तालुक्यातील प्रतापदादा सोनवणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांमधून डाॅ. बच्छाव यांना यावेळी उमेदवारी मिळाली आहे. अद्याप धुळे मतदारसंघात एमआयएमने उमेदवार जाहीर केलेला नाही. वंचित बहुन आघाडीचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी अब्दुर रहमान यांनी अधिक मते घेतल्यास भाजपचे डॉ. भामरे यांच्या पथ्यावर पडू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

डाॅ. शोभा बच्छाव कोण आहेत ?

नाशिक विधानसभा मतदारसंघात २००४ मध्ये भाजपचे माजी मंत्री डाॅ. दौलतराव आहेर यांचा पराभव करुन डाॅ. शोभा बच्छाव या आमदार झाल्या होत्या. २००७ ते २००९ या कालावधीत आरोग्य राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळले. मार्च १९९९ ते २००२ या कालावधीत नाशिकच्या काँग्रेसच्या महापौर राहिल्या. २००९ मध्ये मनसेचे उमेदवार वसंत गिते यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभूत झाल्यानंतरही डाॅ. बच्छाव या काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्या. मालेगाव तालुक्यातील सोनज हे त्यांचे सासर आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालमधल्या तीन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या; कूचबिहार कोण जिंकणार?

धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. धुळे जिल्ह्याबाहेर उमेदवारी देऊन पक्षाने मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे आपले मन व्यथित झाले आहे, असे सनेर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हे राजीनामापत्र पाठविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tough fight between bjp and congress in dhule resignation of district president after nomination of shobha bachhav print politics news ssb