विरार : विरारमध्ये नुकतेच दोन दिवसीय जागतिक मराठी संमेलन पार पडले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा महाविद्यालयात झालेल्या या संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित होते. संमेलनात मराठीचा जागर करण्यात आला असला तरी दोन्ही नेत्यांनी ठाकुरांच्या मैत्रीचे आणि कामाचे गोडवे गायल्याने हे संमेलन म्हणजे ठाकुरांच्या मैत्रीचा जागर झाला होता. विशेष म्हणजे एकेकाळचे कट्टर विरोधक असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकूर यांचे कौतुक केल्याने उभयतांचे सूर जुळल्याचेही मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राजकारणाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला आणि विधानाकडे सूचक म्हणून बघण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरारमध्ये झालेले दोन दिवसांचे जागतिक मराठी संमेलन महत्वपूर्ण ठरले. मुळात या संमेलनाचा खर्च प्रचंड आणि शासनाकडून अनुदान नाही. मग संपूर्ण संमेलनाचा खर्च करेल अशी व्यक्ती आयोजकांना शोधावी लागले. वसई विरारमध्ये ठाकुरांच्या दारात हे संमेलन घेण्यात आलं. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा चॅरिटेबल ट्रस्टने संमेलनाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्याच महाविद्यालयात सोहळा आयोजित केला. पाहुण्यांची शाही बडदास्त ठेवली. या संमेलनाला ठाकुरांचे एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, तसेच भाजपचे घणाघाती तोफ म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेदेखील आले. जगभरातील विविध क्षेत्रांतील मराठी व्यक्तींना एकत्र आणून मराठीचा जागर करणे हा संमेलनाचा हेतू होता. मात्र या मुख्यमंत्री आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनी मात्र ठाकुरांवर स्तुतीसुमनं उधळल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा – जमिनीच्या माध्यमातून रायगडकरांशी जवळीक साधण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न
नियोजित कार्यक्रमात उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समावेश नव्हता. पण आमदार ठाकुरांनी एक फोन केला आणि तत्काळ होकार दिला. ठाकुरांनी फोन केला आणि मी येणार नाही असं कधी होत नाही. त्यांनी एक फोन केला म्हणून मी वेळेआधी आलो असं ते जाहीरपणे म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. हितेंद्र ठाकूर हे लोकांची कामे करतात म्हणून ते इतकी वर्षे निवडून येतात असं जाहीर कौतुक केलं. २०२२ मध्ये नारायण राणे नुकतेच मंत्री झाले होते. तेव्हा राणे यांनी राज्यव्यापी यात्रा काढली होती. ही यात्रा विरारमध्ये आली असताना राणे यांनी मार्ग बदलून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ताटकळत बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांचीदेखील त्यांनी पर्वा केली नव्हती. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन घोषणाबाजी केली होती. ठाकुरांशी माझी जुनी मैत्री आहे, त्यासाठी मी आलो. मी कुणाची पर्वा करत नाही, असंही राणे यांनी त्यावेळी बोलून दाखवलं होतं. विरोधकांचा आक्रमक शैलीत समाचार घेण्यासाठी नारायण राणे प्रसिद्ध आहेत. मात्र संमेलात राणे यांची ठाकुरांशी मैत्रीचं जाहीर प्रदर्शन भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण करून गेलं.
शिंदे -ठाकूर नवे मैत्री पर्व ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती सर्वांना धक्का देणारी होती. एकनाथ शिंदे हे पूर्वी हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. अगदी २०१९ पर्यंत जाहीर सभांमध्ये त्यांनी ठाकुरांना आव्हान दिले होते. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास मंत्री असताना ठाकुरांच्या पालिकेतील वर्चस्वालादेखील शिंदेंचा अडसर असायचा. मात्र सत्ताबदल झाला आणि शिंदे यांची भूमिका बदलली. ‘अप्पा (हितेंद्र ठाकूर) तुम्हाला काही कमी पडू देणार नाही’ असे शिंदे यांनी विधिमंडाळात सांगितले होते. विरारमधील संमेलनातही त्यांनी ठाकुरांच्या मैत्रीचे गोडवे गायले. यामुळे शिवसेना भाजप येत्या निवडणुकीत ठाकुरांशी जुळवून घेणार असे संकेत मिळू लागले आहेत.
शिवसेना, भाजपाच्या स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती
खरंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विरार मध्ये आले होते. स्वागताला शिंदे गटाच्या नेत्यांनी जाणे अपेक्षित होते. पण त्यांच्या स्वागताला आमदार क्षितीज ठाकूर गेले होते. शिदे गटाचे कुणी संमेलनस्थळी आले नव्हते. खासदार राजेंद्र गावित यांना औपचारिकता म्हणून जावे लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे संमेलनात असूनही भाजपाचे कुणीही नेते, पदाधिकारी कार्यक्रमस्थळी फिरकले नव्हते. वसईत सर्वपक्षीय विरूध्द ठाकूर असं राजकारण असतं. ठाकूरांच्या व्यासपीठावर जाण स्थानिक नेत्यांना अडचणीचं ठरणारं असतं. त्यामुळे याही वेळेला शिवसेना, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आपले नेते आले तरी कार्यक्रमला उपस्थित राहिलेच नाही दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी आले होते तेव्हा देखील ते ठाकूरांच्या गाडीतूनच आले होते. आपल्या नेत्यांची ठाकूरांच्या या जाहीर मैत्रीमुळे विरोधकांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. ठाकूरांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. परंतु वरीष्ठ नेते अशा प्रकारे ठाकूरांबरोबर मैत्रीचा जागर करत असतील तर निवडणूकीत करायचं काय असा प्रश्न स्थानिक विरोधकांना पडला आहे.