नाशिक – भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत शनिवारी दिवसभर मंथनात गर्क राहणाऱ्या समस्त मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सायंकाळी निरोपावेळी नागली या पौष्टिक तृणधान्यापासून निर्मिलेल्या नावीन्यपूर्ण खाद्य पदार्थांची अनोखी भेट देण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसह इतर निवडणुकींच्या दृष्टीने पक्षाची ही महत्वाची बैठक आहे. राज्यात आजवर राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेताना पुढील काळासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रम देण्यात येईल. अतिशय शाही पद्धतीने आयोजिलेल्या बैठकीत नागलीद्वारे पदाधिकाऱ्यांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला जाणार आहे. संसदेच्या उपहारगृहात पोहोचलेले नाशिकच्या नागलीचे हे पदार्थ आता राज्यातील पदाधिकाऱ्यांची राजकीय ऊर्जा वाढविण्यासही कारणीभूत ठरावेत, ही भाजपची इच्छा आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्या अंतर्गत देशात तृणधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शरिरात रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यासाठी तृणधान्य उपयुक्त मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात त्यांचा अधिकतम समावेश व्हावा म्हणून सरकारी पातळीवर जनजागृती सुरू आहे. पोषण आहारात देखील त्यांचा अंतर्भाव झाला. हा धागा पकडून भाजपच्या बैठकीत भेटवस्तूच्या रुपाने नागलीचे महत्व अधोरेखीत केले जाणार आहे.

हेही वाचा – Rajani Patil Suspended : रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई, राज्यसभेतील गोंधळाचे चित्रिकरण केल्यामुळे निर्णय!

कार्यकारिणीत केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, प्रदेशस्तरीय आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, असे तब्बल एक हजारहून अधिक जण सहभागी झाले आहेत. प्रत्येकास नागलीपासून निर्मिलेली खारी, खाकरा, बिस्किटे, कुरकुरे, असे जवळपास १० पदार्थ एका डब्याच्या वेष्टनात दिली जातील. माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी ही संकल्पना मांडली. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक सातपूर येथील दी डेमोक्रसी हॉटेल, रिसॉर्ट व कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये होत आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्येच हे बैठक स्थळ आहे. यानिमित्त प्रभागात आलेल्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नागलीच्या पदार्थांची भेट देण्यासाठी याच प्रभागातील शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे आणि पल्लवी पाटील या माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला.

हेही वाचा – चर्चेतील चेहरा… बाळासाहेब थोरात का संतापले?

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात डोंगर उतारावर मुख्यत्वे नागलीचे उत्पादन घेतले जाते. नागली उत्पादनात नाशिक देशात आघाडीवर आहे. त्यास कुठल्याही रासायनिक खतांची गरज भासत नाही. नैसर्गिक, पर्यावरणस्नेही पद्धतीने उत्पादन होते. जीवनसत्वामुळे नागली आरोग्यदायी मानली जाते. पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सरकार तृणधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. तृणधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थांची जनजागृती या उपक्रमातून संपूर्ण राज्यात केली जाणार आहे. नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या उद्योजकांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष असणाऱ्या जाधव यांच्या कारखान्यातील हे उत्पादन आहे. नागलीचे महत्व लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संसदेतील उपहारगृहात ते उपलब्ध करून दिले. आता राज्यभरातील भाजप पदाधिकाऱ्यांमार्फत नागलीचे महत्व पटवून दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची छबी असणाऱ्या खास वेष्टीत डब्यात ही भेट नाशिकमधून मार्गस्थ होताना पदाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A unique gift of food product made from nagli will be given to bjp ministers mla and office bearers in nashik print politics news ssb