अमरावती : भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे आणि काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यात आजवर राजकीय कटुता फारशी दिसली नाही, पण भाजपच्‍या ओबीसी यात्रेच्‍या निमित्‍ताने डॉ. बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्‍या आडनावावरून केलेले वक्‍तव्‍य वादग्रस्‍त ठरले आणि राजकारण पेटले. आता उभय नेत्‍यांमध्‍ये शाब्दिक वाद टोकदार बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा अमरावती जिल्‍ह्यात पोहोचली. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले होते. यशोमती ठाकूर यांच्‍या तिवसा या मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना ‘इंग्रजांची चाकरी केली, म्‍हणून यशोमतींना ठाकूर ही पदवी मिळाली’, अशी टीका डॉ. बोंडे यांनी केली आणि वादाला तोंड फुटले.

हेही वाचा – पप्पू कलानींचे वजन अजित पवारांच्या पारड्यात?

यशोमती ठाकूर यांनी त्‍यावर जोरदार प्रत्‍युत्‍तर देत आडनावावरून राजकारण कशाला करता, मी महिला आमदार आहे, याचे भान ठेवा. ठाकूर या नावाचा इतिहास बोंडेंनी वाचायला हवा, असा सल्‍ला दिला. गॅझेटमध्‍ये स्‍वातंत्र्य संग्राम सेनानी म्‍हणून आजोबांची नोंद आहे. स्‍वातंत्र्य लढ्यात आमच्‍या मोझरी येथील वाड्यातून रसद पुरवली जात होती. दुष्‍काळाच्‍या काळात मोठ्या प्रमाणात दान केले, म्‍हणून ठाकूर ही पदवी मिळाल्‍याचा इतिहास आहे. अनिल बोंडे सध्‍या नैराश्यात आहेत. बोंडे यांच्या बोंड अळ्या आल्या आहेत का? अशी जळजळीत टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

जिल्‍ह्यातील राजकीय नेत्‍यांमध्‍ये शाब्दिक वाद नवीन नसले, तरी ते अलीकडच्‍या काळात विखारी बनत चालले आहेत. डॉ. अनिल बोंडे आणि यशोमती ठाकूर यांच्‍यात वादाची ठिणगी गेल्‍या जुलै महिन्‍यात पडली होती. अमरावतीतील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्‍मा गांधी यांच्‍याविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले होते. संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसचे नेते विधानभवनात आणि रस्त्यावर आक्रमक झाले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी विविध ठिकाणी आंदोलनदेखील केले होते. यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यशोमती ठाकूर यांनी संतापून त्यावेळी ‘हरामखोर’ या शब्दाचा उल्लेख केला होता. या शब्दावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्‍याला घेराव घालत यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्‍यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी पोलीस ठाण्‍यात पोहोचून यशोमती ठाकूर यांच्‍यावर कारवाईची मागणी रेटून धरली होती.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची भाजपची योजना

भाजप आणि काँग्रेसमधील आगामी काळातील संघर्षाची चुणूक सध्‍या पहायला मिळत आहे. जिल्‍ह्यात विधानसभेच्‍या निवडणुकीत केवळ एकच जागा मिळाली होती. भाजपला जिल्‍ह्यावर पकड मजबूत करण्‍याचे वेध लागले आहे. खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला होता, डॉ. बोंडे यांना खासदारकी मिळाली. रवी राणा, बच्‍चू कडू हे दोन आमदार शिंदे-फडणवीस सरकारसोबत आहेत. प्रवीण पोटे, श्रीकांत भारतीय हे भाजपचे दोन विधानपरिषद सदस्‍य अशी मोठी फळी सोबत असताना जिल्‍ह्यातील काँग्रेसच्‍या वर्चस्‍वाला छेद देण्‍यासाठी भाजपच्‍या नेत्‍यांची धडपड चालल्‍याचे दिसून येत आहे. त्‍याचवेळी शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा लाभ पदरात पाडून घेण्‍यासाठी भाजपचे नेते पक्षसंघटनात्‍मक बांधणीत व्‍यस्‍त झाले आहेत.

काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला असून काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व राज्यांमध्ये जातगणना करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी गणना आणि त्यांचा विकास हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. अनिल बोंडे यांना ओबीसींचे नेते म्‍हणून भाजपकडून समोर केले जात असताना काँग्रेसच्‍या विरोधात त्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, पण स्‍थानिक नेत्‍यांवर वैयक्तिक टीका करून त्‍यांचा हेतू साध्‍य होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A verbal spat between yashomati thakur and dr anil bonde has turned extreme in amravati print politics news ssb
First published on: 12-10-2023 at 14:14 IST