दिगंबर शिंदे

सांगली : शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रा काढली आहे़ संवाद नाही या कारणाने सांगलीतील आमदार अनिल बाबर यांच्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट पकडलेली असताना या संपर्क यात्रेवेळी देखील संवाद होऊच शकला नाही. अवघ्या बारा किलोमीटर नदीपलीकडे येऊनही आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सांगलीकडे पाठ फिरवली. कोल्हापूरचा दोन दिवसाचा दौरा आटोपून त्यांनी थेट वाकडी वाट करून कराड गाठले. अखेर जिल्ह्यातील उरलेल्या सेना नेत्यांनी तब्बल ५० किलोमीटरचे अंतर पार करून वाघवाडी फाटा येथे ठाकरेंचे स्वागत करत यात्रेचे जिल्ह्यातील अस्तित्व कसेबसे राखले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडत भाजपबरोबर राजकीय संसार सुरू केल्याचे परिणाम जिल्ह्यातील शिवसेनेवरही झाले. माजी जिल्हा प्रमुख आनंद पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर पक्षाचे एकमेव आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने अगोदरच कमकुवत असलेली सांगलीतील शिवसेना आणखीच अशक्त झाली आहे. जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर पवार यांच्या जाण्यामुळे पश्चिम भागात पक्षात निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी चिकुर्डेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्यावर थेट चार विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा.. Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC Live: सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात, युक्तिवाद सुरु

जिल्ह्यात शिवसेनेची ताकद केवळ एकमेव आमदार असलेल्या बाबर यांच्यामुळेच होती. त्यांच्याच गटातून जिल्हा परिषदेचे तीन सदस्य झाले होते. आता बाबर गटच शिंदे गटात सहभागी झाल्याने खानापूरमध्ये असलेली शिवसेनेची अवस्था अधिकच कठीण झाली आहे. पलूस-कडेगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणूक पराभूत झालेले संजय विभुते यांच्याकडे ठाकरे गटाची ढासळती कमान सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेंतर्गत सुरू असलेली पडझड थोपविण्यासाठी युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रा काढली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांनी बंडखोरांच्या मतदारसंघाला भेटी देऊन सभा घेत बंडखोरांवर टीकास्र सोडले. आजरा, कोल्हापूर येथे ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या. सांगलीपासून जयसिंगपूर अवघ्या १२ किलोमीटरवर असताना त्यांनी सांगलीला वगळून थेट कराडजवळील मलकापूर गाठले.

जिल्ह्यात ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता असतानाही त्यांनी सांगलीकडे फिरवलेली पाठ राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोर आमदार बाबर खानापूरचे आहेत़ दुसरीकडे गटबाजीमुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. अशा अवस्थेत शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी सांगलीचा दौरा अपेक्षित होता. मात्र, ठाकरे यांनी सांगलीला वगळले, यामागे कारण काय असा सवाल केला जात आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकाकी लढत देऊनही फारसा प्रभाव दिसला नाही. बाबर गट शिंदे गटात सामील झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला फारशी आशा नसावी. इस्लामपूर,आष्टा नगरपालिकेत असलेले नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने ठाकरे गटाला जिल्ह्यातील सेना कार्यकर्त्यांकडून फारशी अपेक्षा दिसत नसल्याची चर्चा मात्र रंगली आहे.

Story img Loader