दिवाळीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या असताना आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली होती. पक्ष फोडण्याच्या या हालचालीची कल्पनाच आली नाही. त्यांचा खंजीर दिसला नाही. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेले हे दोन व्यक्तींचे सरकार बेकायदेशीर आहे व ते कोसळेल, असे भाकीत युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. राज्य सरकारने केलेले काम चांगलेच होते. अगदी पहिल्या रायगड किल्ला दुरुस्तीच्या निर्णयापासून ते शेवटच्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या निर्णयापर्यतचे सर्व विकासाचे निर्णय हे राज्य प्रगतिपथावर नेणारे होते. मात्र, त्याच वेळी काही जणांनी गद्दारी केली. पण आता गद्दारांना विनम्रपणे विचारा, तुम्हाला शिवसेना पक्षाकडून आणखी काय हवे होते? काय द्यायचे बाकी राहिले होते? ते आता डोळयात डोळे घालून पाहू शकत नाहीत. पण ज्यांच्या बरोबर काम केले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते गद्दार झाले. त्यांना आता मतपेटीतून उत्तर द्या.
जे सुरतेला जाऊन सत्तेत सहभागी झाले त्यांच्यावर आता आसुड चालवायचा नाही. पण त्यांना वाटतच असेल तर त्यांनी आता राजीनामा द्यावा. मग पाहू कोण निवडून येतो, त्यात जर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला तर सारे काही मान्य करू, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर भावूक भाषण केले. सामान्य माणसांच्या सेवेतील ही ठाकरे कुटुंबीयांची सहावी पिढी आहे. आता झालेल्या गद्दारीनंतर सारे कुटुंबीय एकत्रित बसल्यावर आमचे खरेच काही चुकले का, असाही विचार आता आम्ही करत आहोत. पण ज्या प्रकारची गद्दारी झाली त्याचेच दु:ख अधिक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
औरंगाबाद शहराच्या विकासात केलेल्या अनेक कामांचा उल्लेख त्यांनी केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलेली कामे उद्योगात आणलेली गुंतवणूक औरंगाबादसह महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी होती. शहरातील रस्ते, पूल, कचरा प्रक्रिया प्रकल्प आदी कामे करताना निधीही दिला. दाओसमधील गुंतवणुकीसाठी ८० हजार कोटींचे झालेले करार तसेच कोविड हाताळणीमध्ये राज्याचे देशभर नाव झाले हाेते. मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत तर प्रत्येक सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत असताना ही गद्दारी कशासाठी केली, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मेळाव्यात गद्दार असा शब्द उच्चारला की शिवसैनिक त्यांना माफ करू नका असे जोरात म्हणायचे.
पाहा व्हिडीओ –
गद्दारी करण्यामागे ‘ईडी’ आहे असेही भाषण सुरू असताना शिवसैनिक सांगत होते. त्यामुळे जे घडते आहे ते तुम्हाला माहीत आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचवा आणि प्रेम व आशीर्वाद द्या, असे म्हणत शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या पाठशी नाहीत, असे मेळाव्यातून सांगितले. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आक्रमक भाषण केले, तर अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातून पाच जणांपलीकडे फारसे कोणी फुटले नसल्याचा दावा भाषणातून केला.