सुजित तांबडे
पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही (आप) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागला आहे. पोटनिवडणुकीचा मुहूर्त अद्याप ठरला नसला, तरी आपापल्या पक्षाकडून उमेदवारीची शाश्वती नसलेल्या आणि काहीही करून निवडणूक लढवायचीच, या निर्धाराने निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी ‘आप’कडे घरोबा सुरू केला आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, सर्वच पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात तिकीटासाठी चुरस आहे. याशिवाय भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत.
हेही वाचा >>>महाविकास आघाडीच्या सभेवरून भाजपमध्ये मतभेद
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागेवरून वाद सुरू झाला आहे. ही जागा काँग्रेसकडे असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी हे इच्छुक आहेत. ऐनवेळी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनाही उमेदवारी देण्याची व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हेदेखील स्पर्धेत आहेत. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी पक्षांतर्गत धुसफूूस सुरू असताना पोटनिवडणुकीच्या रिंगणात ‘आप’नेही उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
‘आप’ला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा गमाविला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ला ताकद दाखविण्यासाठी ही एक संधी मानली जात आहे. कसबा आणि पिंपरी विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्यावेळी ‘आप’ने पोटनिवडणुका न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी पिंपरीत ‘आप’कडून मनोहर पाटील यांनी, तर कसब्यामध्ये किरण कद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी पाटील यांचा उमेदवारी अर्ज हा पक्षाचा बी फॉर्म अपूर्ण असल्याने बाद झाला होता. मात्र, त्यानंतर पोटनिवडणुका न लढविण्याचे निश्चित झाल्याने कद्रे यांनी कसब्यातून उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर ‘आप’कडून पोटनिवडणुका न लढण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस आमदारांना भाजपची पुन्हा उमेदवारी
याबाबत ‘आप’चे राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार म्हणाले, ‘विधानसभांच्या पोटनिवडणुका न लढविण्याचे पक्षाचे ठरविले होते. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होेते. मात्र, आता परिस्थिती निराळी आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाल्याने पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्याबाबत पक्ष विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख आणि प्रदेश पातळीवर घेतला जाईल’
‘पक्षाने आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने यापूर्वीच पक्षाने काम सुरू आहे. लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्यास त्याचा फायदा हा महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो, त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे’ असेही कुंभार यांनी सांगितले.
इच्छुकांची बोलणी
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी तयारीत असलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी ‘आप’ हादेखील एक पर्याय ठेवला आहे. काही इच्छुकांकडून बोलणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत विजय कुंभार म्हणाले, ‘काहीजणांकडून संपर्क साधण्यात येत आहे. ही माहिती प्रदेश पातळीवर देण्यात येत आहे. त्यामुळे पोटनिवडणुका लढविण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवरून घेतला गेल्यास उमेदवार निश्चित करणे सोपे होईल’