दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आम आदमी पार्टी आता मध्य प्रदेशमध्ये आपली ताकत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. मध्यप्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे. आम आदमी पार्टीने मध्य प्रदेशातील एकूण १६ महानगर पालिकांपैकी १४ महापालिकांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यात मतदारांना मोफत वीज, पाणी आणि भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका आणि नागरी समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी ‘आप’च्या सिंगरौली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणी अग्रवाल यांच्या प्रचारासाठी आयोजित रोड शोमध्ये सहभागी झाले होते. आपल्या भाषणात केजरीवाल म्हणाले की “सिंगरौलीतील जनतेच्या पाठिंब्याने रस्ते, वीज, पाणी, रोजगार यासह पालिकेचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. दोघांनाही सत्तेत असताना केवळ संपत्ती जमवण्याची काळजी असते. आम आदमी पक्षाचा निधी गोळा करण्यावर विश्वास नाही. आम्ही सर्वसामान्यांच्या खिशात पैसे टाकतो”.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांचा दाखला केजरीवाल यांनी दिला. केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात मोफत वीज, मोफत शिक्षण आणि मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. सत्तेत आल्यास येत्या पाच वर्षात सिंगरौलीचा कायापालट करू असे त्यांनी मतदारांना सांगितले. “जर दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर मी पुढच्या निवडणुकीत मत मागण्यासाठी तोंड दाखवणार नाही” असे केजरीवाल म्हणाले. येत्या काही दिवसांत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे आमदार आतिशी सिंह हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात येणार आहेत. आप ने २०१३ मध्ये मध्य प्रदेशात राजकीय पदार्पण केले होते पण त्यावेळी त्यांना अपयश आले.आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाब आणि गोव्यानंतर, पक्ष गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आसाम सारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी मध्य प्रदेशात निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आपचे प्रदेशाध्यक्ष पंकज सिंह यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “पक्षाने प्राथमीक सदस्य मोहिमेपासून सुरुवात केली. ‘मिशन बुनियाद’ त्यानंतर मिशन ‘विस्तार’ आशा वेगवेगळ्या मोहीमा राबवून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. राज्यभरात आपचे अडीच लाखांहून अधिक कार्यकर्ते आहेत”. सिंगरौलीमध्ये आमच्या पक्षाची सध्या चांगली स्थिती असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहेराणी अग्रवाल या ‘आप’च्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राणी अग्रवाल यांना एकूण मतदानाच्या २१.५९ टक्के मते मिळाली होती. त्या निवडणुकीत त्यांनी तिसरे स्थान मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या भाजपच्या राम लल्लू वैश्य यांच्यापेक्षा त्या फार थोड्या फरकाने मागे होत्या.