दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांच्या प्रकृतीवरून आप आणि तिहार तुरुंग प्रशासनात मतभेद असल्याचे चित्र आहे. आपने तुरुंगात केजरीवाल यांचे वजन घटल्याचा आणि साखरेची पातळी खालवल्याचा दावा केला आहे, तर तुरुंग अधिकाऱ्यांचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल पुर्णपणे बरे आहेत. आप आणि तुरुंग प्रशासन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. पक्षाने यापूर्वीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती.
केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत ‘आप’ची भूमिका
दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी रविवारी (१४ जुलै) केजरीवाल यांच्या प्रकृतीचे कायमचे नुकसान करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी पाच वेळा ५० मिलीग्राम प्रति डेसीलीटरच्या खाली गेल्याचा दावा त्यांनी केला. केजरीवाल उच्च मधुमेहाचे रुग्ण आहेत. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आतिशी यांनी केजरीवाल यांचे वजन घटल्याचाही दावा केला. शनिवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही असाच दावा केला होता. त्यांनी आरोप केला की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे तुरुंगात ८.५ किलोग्रॅम वजन घटले. ते म्हणाले की, हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अटकेवेळी केजरीवाल यांचे वजन ७० किलोग्रॅम होते, ते ६१.५ किलोग्रॅम घसरले असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा : राम मंदिर आणि मोदींवर भाजपाचा अतिविश्वास होता का? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल काय म्हणाल्या?
संजय सिंह यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केजरीवाल यांना तुरुंगात ठेवण्याचा आणि त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ मार्च रोजी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मद्य घोटाळा प्रकरणातील एक आरोपी म्हणून अटक केली होती. १ एप्रिलपासून ते तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मे महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला होता, ते २ जून रोजी तिहार तुरुंगात परतले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे, मात्र आता ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
तिहार तुरुंग प्रशासनाची प्रतिक्रिया
तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांचे तुरुंगात आठ किलोपेक्षा जास्त वजन कमी झाल्याचा ‘आप’चा दावा फेटाळून लावला आहे. प्रशासनातील सूत्रांनी सोमवारी (१५ जुलै) सांगितले की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वजन केवळ दोन किलो कमी झाले आहे आणि एम्सच्या वैद्यकीय मंडळाद्वारे त्यांचा रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमितपणे तपासली जात आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. दिल्ली सरकारच्या गृह विभागाला लिहिलेल्या पत्रात तिहार तुरुंग अधीक्षकांनी सांगितले की, केजरीवाल यांना १ एप्रिल रोजी तुरुंगात आणण्यात आले तेव्हा त्यांचे वजन ६५ किलोग्रॅम होते. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार १० मे रोजी त्यांना निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळाला तेव्हा त्यांचे वजन ६४ किलोग्रॅम होते.
२ जून रोजी जेव्हा त्यांनी आत्मसमर्पण केले तेव्हा केजरीवाल यांचे वजन ६३.५ किलोग्रॅम होते आणि सध्या ते ६१.५ किलोग्रॅम आहे, असे अहवालात नमूद केले आहे. “वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, वजन कमी होण्याचे कारण कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करणे असू शकते,” असे पत्रात म्हटले आहे. केजरीवाल यांना दिवसातून तीन वेळा घरी तयार केलेले जेवण दिले जात असल्याचेही तुरुंग अधीक्षकांनी नमूद केले. पत्रात म्हटले आहे की सध्या, केजरीवाल यांचे वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखरेचे परीक्षण केले जात आहे आणि वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचार आणि आहार दिला जात आहे.”
तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री देखरेखीखाली आहेत. ‘आप’च्या दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, “अशा प्रकारची खोटी माहिती कारागृह प्रशासनाला मारहाण करण्याच्या हेतूने पसरवली जात आहे आणि जनतेला गोंधळात टाकत, त्यांची दिशाभूल केली जात आहे.”
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”- संजय सिंह
आप खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंग प्रशासनाला एका कैद्याचा वैद्यकीय अहवाल प्रसारमाध्यमांना जाहीर करणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. सोमवारी, त्यांनी सांगितले की तुरुंग अधिकार्यांनी दिलेल्या अहवालात सांगितले आहे की केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेक वेळा कमी झाली आहे. “जर साखरेचे प्रमाण कमी असेल तर झोपेत व्यक्ती कोमात जाऊ शकतो. ब्रेन स्ट्रोकचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो,” असे सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ज्या दिवशी त्यांना (केजरीवाल) अटक करण्यात आली, तेव्हा त्यांचे वजन ७० किलोग्रॅम होते, जे आता ६१.५ किलोग्रॅमवर आले आहे. मी पंतप्रधान मोदींना केजरीवाल यांच्या आयुष्याशी खेळू नका, असे आवाहन करतो. कारण, काही अनुचित प्रकार घडल्यास केंद्राला उत्तर देणे कठीण होईल,” असे त्यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले.
भाजपाची ‘आप’वर सडकून टीका
या आरोपांवरून भाजपाने आपवर सडकून टीका केली आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्या पक्षावर न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी नाटक केल्याचा आणि त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन मिळाल्याचा आरोप केला.
केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत ‘आप’ने चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिलमध्ये, ‘आप’ने आरोप केला होता की २१ मार्च रोजी ईडीने अटक केल्यापासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वजन ४.५ किलोग्रॅम कमी झाले होते. आतिशी यांनी दावा केला होता, “ईडी कोठडीत त्यांची साखरेची पातळी तीनदा कमी झाली, एका वेळी ही पातळी अगदी ४६ मिलीग्रॅम प्रति डेसीलीटर पर्यंत पोहोचली, जी कोणत्याही व्यक्तीसाठी प्राणघातक असू शकते.”
हेही वाचा : दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष
तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी ‘आप’चे दावे फेटाळले होते, कारण त्यांना तुरुंगात आणले तेव्हा त्यांचे वजन ६५ किलोग्रॅम होते. २ एप्रिल रोजी त्यांची साखरेची पातळी कमी झाली परंतु रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली. साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी त्यांना टॉफीसह साखरेचे काही पदार्थ देण्यात आले होते, असे तुरुंग अधिक्षकांनी सांगितले होते.