लोकसभा निवडणूक जाहीर व्हायला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. अशातच आता इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना आम आदमी पक्षाने आता गोव्यातील दक्षिण गोवा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. यापूर्वी आपने पंजाब आणि चंदिगडमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.
आम आदमी पक्षाच्या या निर्णयानंतर आता इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने ज्या मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे, तो मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
हेही वाचा – सोनिया गांधींकडून राज्यसभा लढण्याचा निर्णय; रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार?
मंगळवारी आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी पत्रकार परिषद घेत, उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. बेनौलिमचे आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगास हे दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील, असे ते म्हणाले. तसेच जागावाटपाबाबत होत असलेल्या विलंबाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ”आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने जागावाटपासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर बैठका घेतल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरात या संदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसकडून जागावाटपाबाबत विलंब होतो आहे”, असे ते म्हणाले.
”खरं तर जागावाटपाबाबत ८ जानेवारी रोजी पहिली बैठक पार पडली होती. त्यानंतर १२ जानेवारी रोजी दुसरी बैठक पार पडली. मात्र, तेव्हापासून कोणतीही औपचारिक बैठक पार पडलेली नाही. सध्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. अशा वेळी उमेदवार निश्चित करण्यात उशीर झाल्यास, त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
”आम्ही केवळ निवडणूक लढवायची म्हणून लढत नाही. आम्हाला या निवडणुकीत जिंकून भाजपाचा पराभव करायचा आहे. त्या दृष्टीनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात आमचे उमेदवार व्हेंझी हे निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे,” असेही ते म्हणाले. तसेच आम्ही सक्षम उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांचे वरिष्ठ नेते निर्णय घेण्यास उशीर करीत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
या संदर्भात बोलताना, आपचे नेते वाल्मीकी नाईक म्हणाले, “आम्ही इंडिया आघाडीचा भाग आहोत. हा दबावाच्या राजकारणाचा भाग नाही. आम्ही युती धर्माचे पालन करीत आहोत. व्हेंझी हे नक्कीच जिंकून येतील.” तसेच त्यांनी उत्तर गोव्याच्या जागेबाबत काँग्रेसशी चर्चा सुरू राहणार असल्याचीही माहिती दिली.
हेही वाचा – नितीश कुमार भाजपाबरोबर नव्या कपड्यांत; ‘धर्मनिरपेक्षते’च्या भूमिकेत बदल होणार का?
दरम्यान, आपच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा हा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ”केवळ उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आपच्या प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद का घेतली, हे आमच्या समजण्यापलीकडे आहे. त्यातही त्यांनी दक्षिण गोव्याच्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांचा हा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे.
गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा असलेल्या दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्डिन्हा हे खासदार आहेत. २०२२ साली या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले नसले तरी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.