Panjab CM Bhagwant Mann Interview गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष (आप) अडचणीत असल्याचे चित्र आहे. पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अनेक दिवसांपासून मद्य धोरणप्रकरणी तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत पक्षातील काही प्रमुख चेहर्यांनी लोकसभा निवडणुकीची धुरा हाती घेतली आहे. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचादेखील समावेश आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
जिंकण्याची किंवा हरण्याची नाही तर लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक
लोकसभा निवडणूक किती महत्त्वाची असा प्रश्न केला असता, भगवंत मान म्हणाले, ही निवडणूक जिंकण्याची किंवा हरण्याची नाही तर लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. आम्हाला ४०० जागा द्या आणि आम्ही संविधान बदलू, असे दोन-तीन नेत्यांनी सांगितले आहे. त्यांची हिंमत कशी झाली? तसेही ते संविधान पाळत नाहीत. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, पण ते न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या बाजूने ५-० असा निकाल दिला, पण त्यांनी संध्याकाळी ६ वाजता अध्यादेश आणून निर्णय बदलला. ते निवडणूक आयोगाचेही ऐकत नाहीत. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय हे त्यांचे ‘कमाऊ बेटे’ (कमावते पुत्र) आहेत. जिथे भाजपा निवडून येत नाही तिथे निवडून आलेल्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे भाजपाचे धोरण आहे.
हेही वाचा : “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
ते पुढे म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अगर लोग चूक गये, तो रशिया की तरह, पुतिन की तरह बस मैं, मैं, मैं होगा, और विपक्ष खतम (जर लोक या वेळी चुकले, तर भारत रशिया, पुतिनसारखा होईल आणि देशात कोणीही विरोधक नसेल).
भाजपा हतबल होईल
इंडिया आघाडीला देशभरात कसा प्रतिसाद मिळत आहे, यावर ते म्हणाले, मला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ममताजी पश्चिम बंगालमधून लढत आहेत, त्यांना हरवण्याची भाजपात हिंमत नाही. मी पंजाबमधून, अखिलेशजी उत्तर प्रदेशमधून, तेजस्वी बिहारमधून, ठाकरे आणि पवारजी महाराष्ट्रातून, स्टॅलिन तमिळनाडूतून लढत आहेत. आम्ही (इंडिया आघाडी) त्यांचा चौफेर पराभव करू. भाजपा हतबल झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरचे एक्झिट पोलचे लीक झालेले निकाल हे दर्शवतात की, पक्षाची कामगिरी चांगली नाही. पंजाबमध्ये काँग्रेसबरोबर युती करण्याचा विचार करत आहात का? यावर मान म्हणाले, नाही, आम्ही सर्व १३ उमेदवार घोषित केले आहेत आणि काँग्रेसनेही काही उमेदवार जाहीर केले आहेत.
केजरीवालांची तुरुंगातून सुटका न झाल्यास ‘आप’चे काय?
केजरीवाल ही एक व्यक्ती नसून विचार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला अटक करू शकता, पण त्यांच्या विचारांना नाही. आप ही स्वयंसेवी संस्था नाही, एक राष्ट्रीय पक्ष आहे. गुजरातमध्ये आमचे पाच आमदार आहेत, गोव्यात दोन, राज्यसभेत आमचे १३ लोक आहेत, दोन महापौर आहेत. खोट्या खटल्यात केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले आहे, पण ‘आप’ त्यांच्या पाठिशी उभी आहे. आम्ही सर्वात तरुण, नवीनतम आणि वेगाने वाढणारा पक्ष आहोत.
जनसंघाचा जन्म १९५८ मध्ये झाला आणि त्यांना २६ वर्षांनी १९८४ मध्ये दोन खासदार मिळाले. काँग्रेसचा जन्म १८८५ मध्ये झाला, पण १९३० मध्ये त्यांना दोन नगरसेवक मिळाले. आमचा जन्म २०१२ मध्ये झाला आहे आणि आमच्याकडे दोन राज्यांमध्ये दोन सरकारे आहेत. आम्ही पंजाबच्या सर्व १३ जागा जिंकू. आम आदमी पार्टी हे देशाचे भविष्य आहे, असे मान यांनी सांगितले.
आपल्या राष्ट्रीय भूमिकेविषयी मान म्हणाले, माझ्यावर जे काम सोपवले जाईल ते मी करेन. यापूर्वीही मी अरविंदजींबरोबर अनेक ठिकाणी जायचो. गुजरातमध्ये आम्ही एकत्र प्रचार केला. मी मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे गेलो आहे. ते माझ्याशी लहान भावाप्रमाणे वागतात. माझ्यावर जे काही कर्तव्य असेल ते मी पार पाडेन. आमच्याकडे इतरांसारखा उच्चाधिकार नाही, आमचे नाते हे कुटुंबाचे आहे.
केजरीवाल यांना तुरुंगातून कार्यालय चालवायला दिले नाही तर पक्ष कोण सांभाळणार?
भगवंत मान म्हणाले, त्यांनी राजीनामा द्यावा असा काही नियम नाही. ते एखाद्या व्यक्तीला अटक करतात आणि म्हणतात, आम्ही तपास करत आहोत आणि तपास वर्षानुवर्षे सुरू राहू शकतो; फक्त भाजपाकडे वॉशिंग पावडर आहे का? त्यांनी अशा भ्रष्ट राजकारण्यांना आपल्या गोटात घेतले आहे आणि इतरांना ते म्हणतात, “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” (आम्ही भ्रष्टाचार सहन करणार नाही). ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, तो त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा देऊ शकला नाही. पण, त्याच माणसाने भाजपासाठी ५५ कोटींचे इलेक्ट्रोल बाँड विकत घेतले आहे.
“पक्षांतराचे हे राजकारण फार काळ चालणार नाही”
आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लोक पक्ष बदलताना दिसत आहेत. हे राजकीय नैतिकतेतील बदल दर्शवते का? यावर मान म्हणाले, एखादी व्यक्ती कोणत्या परिस्थितीत पक्ष बदलते याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. पण, आमचा पक्ष स्वयंसेवकांतून जन्माला आला आहे. मी माझ्या स्वयंसेवकांशी कधीही गैरवर्तन करणार नाही. आमच्या काही नेत्यांनीही पक्ष बदलला आहे, पण ते आता कुठे आहेत? पक्षांतराचे हे राजकारण फार काळ चालणार नाही.
या निवडणुका पंजाबमधील ‘आप’साठी रिॲलिटी चेक आहेत का? यावर भगवंत मान म्हणाले की, विरोधी पक्ष ७० वर्षांत जे करू शकले नाहीत ते आम्ही दोन वर्षांत करून दाखवले. मोफत वीजपुरवठ्यासाठी पैसे कुठून आणणार, असे विरोधक म्हणायचे. आज आमच्या विरोधकांनाही शून्य बिल येत आहे. ६०० पेक्षा कमी युनिट असलेल्या कोणालाही बिल भरावे लागत नाही. आमच्या काळात भ्रष्टाचार नियंत्रणात आहे, तसेच कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय ४३ हजार सरकारी नोकऱ्या आहेत.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते, म्हणून त्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी मध्यरात्री उठण्याची गरज नाही. आम्ही आम आदमी दवाखाने, प्रख्यात शाळा, घरोघरी रेशन आदी गोष्टी सुरू केल्या आहेत. या वर्षी सरकारी शाळांचा निकाल ९८ टक्के लागला, दोन टॉपर्स सरकारी शाळांमधून आहेत. यावर्षी दोन लाख विद्यार्थी खासगीतून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतील, अशी आमची अपेक्षा आहे.
शेतकर्यांसाठी काय?
९९ टक्के तांदूळ आम्ही देशात विकतो. परंतु, तांदुळाच्या पिकांनी पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. आता एफसीआयला इतर राज्यांतून तांदूळ मिळत आहे. त्यात वैविध्य आणावे लागेल. मी केंद्राला सुचवले आहे की, त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना कडधान्य पिकवायला सांगावे आणि त्यांना धानापासून मिळणारा नफा कमी होऊ देणार नाही, अशी रक्कम द्यावी; तो एक चांगला उपाय आहे.
परंतु, जेव्हा शेतकरी कायदेशीर हमी (एमएसपीसाठी) मिळवण्यासाठी दिल्लीला जातो, तेव्हा त्यांना हरियाणातच रोखले जाते. आमच्या शेतकऱ्याने जायचे कुठे? पत्रकार मला विचारतात, शेतकरी दिल्लीत का येतात? मी म्हणालो, मी त्यांना लाहोरला पाठवू का? शेतकरी शांततेने आंदोलन करत होते, ते कोणत्याही धमक्या देत नव्हते, आम्ही लाल किल्ला पाडू असे म्हणत नव्हते. पोलिसच हिंसक होते, असा आरोप मान यांनी केला.
“हम काम की राजनीती करते हैं, नाम की नहीं”
पंजाबमधील ध्रुवीकरणाविषयी बोलताना मान म्हणाले, आप एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. हम काम की राजनीती करते हैं, नाम की नहीं. सुवर्ण मंदिरात दिवसाला एक लाखाहून अधिक लोकांची ये-जा असते. पंजाबचे सामाजिक बंध खूप घट्ट आहेत. आम्ही दिवाळी, दसरा, ईद, गुरुपूरबही साजरे करतो. आनंदपूर साहिब हे शिखांच्या पाच तख्तांपैकी एक आहे. तेथील आतापर्यंतचे खासदार मनीष तिवारी ब्राह्मण होते. फरीदकोट ही एक पंथिक जागा आहे, पण मोहम्मद सादिक तिथले खासदार होते. पंजाबची जनता तुमच्या नावाची पर्वा करत नाहीत. ही गुरू, पीर आणि शहीदांची भूमी आहे.
“भाजपाला सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली आमदार व मंत्री झाल्याचा राग”
भगवंत मान म्हणाले की, मी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहतो. मी सातौज येथील माझ्या गावातील घरी असतो तर लोक मला भेटू शकले असते का? माझे आमदार अजूनही आम (सामान्य) आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली आमदार, मंत्री झाल्याचा राग विरोधी पक्षात आहे. हा काही मोजक्या लोकांचा हक्क आहे असे त्यांना वाटते.
सुडाच्या राजकारणाच्या आरोपांविषयी बोलताना मान म्हणाले की, मी आशु, धरमसोत, शाम सुंदर अरोरा आणि इतरांना भेटलेलो नाही. माझा त्यांच्याशी जमिनीचा वाद नाही. त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे. माझे सर्वांसाठी समान नियम आहेत. माझ्या आई आणि पत्नीसह माझे मित्र किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही नियम मोडला तर त्यांना परिणाम भोगावे लागतील. त्यांनी माझ्याकडून दयेची अपेक्षा करू नये.
“केजरीवालांची दिल्ली, मोदींच्या दिल्लीपेक्षा वेगळी”
पंजाबचे नियंत्रण दिल्लीतून होते या आरोपावर मान म्हणाले, आमच्या पक्षाचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे, तसेच भाजपा, काँग्रेसचेही आहे. आमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठीही दिल्लीत आहेत. आम्ही अनेक निर्णय पंजाबमध्ये बसून घेतले आहेत. परंतु, त्यांनी आमच्या कोणत्याही निर्णयावर कधीच आक्षेप घेतला नाही. आम्ही एक कुटुंब आहोत. केजरीवाल यांची दिल्ली मोदींच्या दिल्लीपेक्षा वेगळी आहे. २०११ मध्ये मी माझे वडील गमावल्यामुळे माझ्या लग्नसमारंभात अरविंदजींनी माझ्या वडिलांची जागा घेतली. आम्ही एक आहोत, आमचा देश एक आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?
मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर मान म्हणाले, मी अजून काही केले नाही. मला पंजाबला सर्व क्षेत्रात नंबर १ करायचे आहे. मला यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. जर मी आता काही केले नाही तर मी येणाऱ्या पिढ्यांना उत्तर देऊ शकणार नाही. फक्त दोन वर्षे झाली आहेत आणि मी अजूनही शिकत आहे, पण पंजाबसाठी माझी खूप मोठी स्वप्ने आहेत.