दिल्ली महापौर पदासाठी आज अखेर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला. शैली ओबेरॉय या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ च्या नगरसेविका आहेत.
या विजयानंतर शैली ओबेरॉय यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे आभार मानले. तसेच आम्ही उद्यापासूनच काम सुरू करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – ‘युपी में का बा’ म्हणत भाजपावर टीका करणारी गायिका नेहा सिंह राठोडला पोलिसांची नोटीस
यासंदर्भात बोलताना, हा जनतेचा विजय आणि गुंडांचा पराभव आहे. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली. याबरोबरच त्यांनी नवनियुक्त महापौर शैली ओबेरॉय यांचे अभिनंदनही केले.
तत्पूर्वी आज सकाळी महापौर पदासाठी मतदान पार पडले. यावेळी दिल्लीतील १० खासदार, १४ आमदार आणि निवडून आलेल्या २५० पैकी २४१ नगरसेवकांनी मतदान केलं.
दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत आम आमदी पक्षाला १३४ तर भाजपाला १०४ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर महापौर पदासाठी दोन वेळा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, दोन्ही वेळी गोंधळ निर्माण झाल्याने आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज मतदान घेण्यात आले.