गुजरातच्या गांधीनगर येथील २० वर्षीय हर्ष सोलंकी नावाच्या दलित तरुणाला रविवारी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या हर्षला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे आमंत्रण दिल्याने संपूर्ण सोलंकी कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. हर्ष सोलंकी याच्यासह त्याची आई आणि बहीणही दिल्लीत आले.
यावेळी आम आदमी पार्टीकडून संपूर्ण कुटुंबाची विमानाच्या तिकीटांपासून स्वागताची सर्व तयारी केली होती. शिवाय हर्षसह त्याच्या कुटुंबाला दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळा अशा ‘आप’च्या विकासकामांची सैर घडवली. यानंतर अरविंद केजरीवालांनी संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्रित जेवण केलं. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करतात. पण भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या दलित तरुणाला मुख्यमंत्र्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं.
यानंतर काँग्रेसने याला राजकीय दिखाऊपणा म्हणत आम आदमी पार्टीवर टीका केली. तर भाजपाने याला ‘नौटंकी’ म्हटलं. पण ‘आप’ने सोलंकी कुटुंबाप्रमाणे संपूर्ण दिवसाचा आनंद लुटला. २० वर्षीय हर्ष हा गांधीनगर महापालिकेत कंत्राटी स्वच्छता कामगार म्हणून काम करतो. त्याची आई लता बेन ह्याही सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. तर हर्षच्या बहिणीने अलीकडेच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या संपूर्ण कुटुंबाची पहिलीच दिल्लीवारी होती, विमानात बसण्याचीही पहिलीच वेळ होती.
हेही वाचा- राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांचं आठ शब्दांत उत्तर, म्हणाले…
खरं तर, रविवारी अरविंद केजरीवाल यांची अहमदाबादमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत एक बैठकी पार पडली. या बैठकीत २० वर्षीय तरुण हर्ष सोलंकीही उपस्थित होता. यावेळी हर्षने केजरीवालांना विचारलं की, काही दिवसांपूर्वी तुम्ही शहरातील एका ऑटोरिक्षा चालकाच्या घरी आला होता. त्याप्रमाणे तुम्ही माझ्याही घरी भेट देणार का? असं विचारल्यानंतर केजरीवालांनी उत्तर दिलं की, निवडणुकीपूर्वी दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याची राजकारण्यांना सवय आहे. मात्र, त्यांनी कधीही कोणत्याही दलित व्यक्तीला आपल्या घरी जेवणासाठी बोलावलं नाही. पण मीच तुला जेवणासाठी आमंत्रण देतो, असं म्हणत अरविंद केजरीवालांनीच हर्ष सोलंकी याला सहकुटुंब घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं.
हेही वाचा- शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा
सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता सोलंकी कुटुंब दिल्लीत दाखल झालं. यावेळी विमानतळावर ‘आप’चे राज्यसभा खासदार आणि गुजरात निवडणूक सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी त्यांचं स्वागत केले. गुजरातहून अवघ्या तीन तासांत सोलंकी कुटुंब दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबाला सर्वप्रथम दिल्लीतील सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये नेण्यात आले. सरकारी शाळांचा झालेला कायापालट पाहून १० वीपर्यंत शिक्षण घेतलेला हर्ष मंत्रमुग्ध झाला. गुजरातमधील शाळांमध्ये आपण स्विमिंग पूलसारख्या सोयीसुविधा असलेली सरकारी शाळा कधीच पाहिली नसल्याचं त्याने सांगितलं. अशा शाळा गुजरातमध्येही निर्माण केल्या पाहिजेत, असंही हर्ष यावेळी म्हणाला.
हर्षची बहीण सुहानी बारावीपर्यंत एका खासगी शाळेत शिकली. पण दिल्लीच्या सरकारी शाळा तिच्या खासगी शाळेपेक्षाही चांगल्या असल्याचं तिने म्हटलं. खासगी शाळा भरमसाठ फी आकारतात तरीही सुविधा देत नाहीत. तिथे मुलं-मुली असा भेदभाव केला जातो, असंही सुहानीने सांगितलं.