दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्तेत आल्यास पुढील वर्षी जानेवारी अखेरपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही योजना लागू करण्यासाठी पंजाबमध्ये नुकतीच जारी केलेली सरकारी अधिसूचना दाखवत सुरतमधील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे. गुजरातमध्ये जवळपास ९२ जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात भाजपाचे मतदार आम आदमी पक्षाला मतदान करतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. “२०१४ मधील दिल्लीतील निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज मी वर्तवला होता. त्याचसोबत दिल्लीत आप सरकार स्थापन करेल, असे मी एका पत्रकाराला लेखी दिले होते. हे भाकित खरे ठरले”, अशी आठवणही यावेळी केजरीवाल यांनी सांगितली.
Gujarat Election 2022 : “दिल्लीतील ‘आप’चा ‘नमूना’ दहशतवादाचा…”; योगी आदित्यनाथ यांची केजरीवालांवर जहाल टीका
गुजरातमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आशा कार्यकर्त्या, पोलीस खात्यातील होमगार्ड्स आणि सरकारी विभागात काम करणाऱ्या अनेकांचे वेतन वाढवू, असे आश्वासन गुजरात निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी दिले आहे. सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार ज्या पक्षाला निवडणुकीत मतदान करतात तो पक्ष निवडणूक जिंकतो, असा आजवरचा अनुभव असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितले आहे.
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
गुजरातमध्ये आपला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून भाजपा नेत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी आप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. गुजरात निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे.