आम आदमी पार्टी सध्या बऱ्याच अडचणींमधून जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला सातपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल अद्यापही तुरुंगात आहेत. त्यामुळे दिल्लीचा कारभार सध्या अधांतरीच आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाला गळतीचा सामनाही करावा लागत आहे. छत्तरपूरचे आमदार करतार सिंह तंवर यांनी बुधवारी (१० जुलै) आम आदमी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तंवर यांनी आपमधील ‘हुकूमशाही’मुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे म्हटले आहे. “दिल्लीची अवस्था फारच वाईट झाली आहे. मात्र, आप पक्षाच्या मंत्र्यांची हुकूमशाही आणि त्यांच्या धोरणांमुळे त्याबाबत आम्ही काहीही करू शकत नाही. गेले तीन महिने कडक उन्हाळा असूनही दिल्लीची जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही यासंदर्भात मंत्र्यांकडे बोलणी केली, तेव्हा त्यांनी नायब राज्यपाल, पंतप्रधान मोदी आणि हरियाणा सरकारवर त्याचे खापर फोडण्याचे काम केले”, असे तंवर यांनी म्हटले.
नगरसेवक ते आमदार
तंवर यांनी पक्ष सोडण्याचा मोठा फटका आपला बसला आहे. पक्षाच्या एका नेत्याने म्हटले की, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वत:हून तंवर यांना बोलावून दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली होती.” मात्र, त्यांची सरतेशेवटी उमेदवारी जाहीर झाली नाही. आपने त्यांच्याऐवजी साही राम यांना उमेदवारी दिली. भाजपाच्या रामवीर सिंह बिधुरी यांच्याकडून त्यांचा ६९ हजार मतांनी पराभव झाला. तंवर (६२) यांचे छत्तरपूर भागामध्ये प्रभुत्व आहे. बुधवारी तंवर यांनी पटेल नगरच्या माजी आमदार वीणा आनंद, वॉर्ड कौन्सिलर उमेश सिंह फोगाट आणि कार्यकर्ते रत्नेश गुप्ता व सचिन राय यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला.
आयकर विभागाचे छापे आणि घरवापसी
भाजपाच्या तिकिटावर दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या तंवर यांच्यासाठी भाजपामध्ये जाणे ही एकप्रकारची घरवापसी आहे. २०१४ मध्ये ते आप पक्षामध्ये सामील झाले होते. त्यांनी २०१५ साली दिल्लीच्या छत्तरपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला. २०२० च्या विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश प्राप्त केले. जुलै २०१६ मध्ये, आयकर विभागाने त्यांच्या फतेहपूर गावातील घरावर आणि दक्षिण दिल्लीतील फार्महाऊसवर छापा टाकला होता. आयकर विभागाने या छाप्यामध्ये रोख रक्कम सापडल्याचा दावा केला होता. तसेच तंवर यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे निदर्शनास आणले होते. बुधवारी काही आप नेत्यांनी तंवर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना याच आयकर विभागाच्या छाप्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, आयकर विभागाचा ससेमिरा रोखण्यासाठीच तंवर यांनी हा निर्णय घेतला. “ते दबावामध्ये होते,” असे आपच्या नेत्यांनी म्हटले.
अरविंद केजरीवालांना जामीन; पण तुरुंगातच रहावे लागणार
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’च्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या जामिनानंतर त्यांना दिलासा मिळाला होता; मात्र काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी त्यांना सध्या तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे.