लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. अशातच दिल्लीतील आम आदमी पक्षानेही लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
हेही वाचा – पक्षाअंतर्गत विरोधकांशी संवाद साधण्याची विखे-पाटील यांना गरज का भासली ?
या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार म्हणाले, “आम्ही इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये फूट पडेल, अशी कोणतीही कृती करणार नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करू. त्याशिवाय इंडिया आघाडीतील जागावाटपानुसार आम्ही पंजाबमधील सर्व जागा, दिल्ली, गोवा व गुजरातमधील काही जागांवर निवडणूक लढविणार आहोत.”
दरम्यान, आपने मागील काही वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय आंदोलने केली आहेत. तसेच आपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा महाराष्ट्राचा दौराही केला आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपचे प्रदर्शनही चांगले राहिले आहे. आम आदमी पक्ष सध्या आगामी स्वराज्य संस्था आणि विधानसभा यांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचेही आपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार करतील. खरे तर मागील काही वर्षांत आपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात बऱ्यापैकी जनाधार निर्माण केला आहे. त्याचा फायदाही महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक
‘आप’ने २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्या निवडणुकीत ‘आप’ला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ‘आप’ने गुजरात आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. अशात आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा एक भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतांचे विभाजन टाळण्यासाठी ‘आप’ने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.