आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून विरोधी बाकावरील एकूण २६ पक्ष एकत्र आले आहेत. २०२४ साली होणाऱ्या या निवडणुकीत हे सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या पक्षांत राष्ट्रीय पातळीवर युती झालेली असली तरी, राज्य पातळीवर मात्र मतभेद अद्याप कायमच आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. असे असतानाच आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने आम्ही बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे.
निवडणूक लढवण्यावर सर्वांचे एकमत
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक २०२५ साली जाहीर होणार आहे. ही निवडणूक अद्याप लांब असली तरी आप पक्षाच्या या भूमिकेमुळे इंडिया या आघाडीत नाराजीचे सूर उमटू शकतात. आप पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक यांनी दिल्लीमध्ये बिहारमधील आपचे कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर बिहारमध्ये पक्षाचा विस्तार करण्यावर एकमत झाले. पक्ष बळकटीसाठी एक प्रयत्न म्हणून बिहारची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत पाठक यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “घाणेरड्या राजकाणामुळे बिहारमध्ये आतापर्यंत जी प्रगती होणे अपेक्षित होती ती झालेली नाही. आप पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. मात्र निवडणूक लढवण्याआधी तेथे पक्ष बळकट असणे गरजचे आहे,” असे पाठक म्हणाले.
“निवडणुका कधी लढवायच्या हे पक्ष ठरवेल”
पक्षाला बळकट करण्यासाठी आगामी काळात आम्ही गावपातळीवर शाखा आणि समित्या स्थापन करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. “आम्ही बिहारमधील निवडणुका लढवणार आहोत. मात्र या निवडणुका नेमक्या कधी लढवायच्या हे पक्ष ठरवेल. आम्ही बिहारमध्ये थेट निवडणूक लढवू शकत नाही. कारण अगोदर आम्हाला तेथे पक्ष बळकट करावा लागेल. त्यासाठी प्रत्येक गावात आमची शाखा निर्माण करावी लागेल. तेथे पक्षविस्तारासाठी खूप मेहनत करणे गरजेचे आहे. तेथे एकदा पक्ष बळकट झाल्यावर आम्ही तेथे निवडणुका लढवणार आहोत,” असे पाठक यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून श्रीगणेशा?
यावेळी बोलताना त्यांनी आमचा पक्ष तेथे अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतो, अशी शक्यता वर्तवली. तसेच भाजपावर टीका करताना, सध्या देश कठीण काळातून जात आहे. या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाषण देण्याव्यतिरिक्त कोणतेही उत्तर नाही, असे पाठक म्हणाले.
आपच्या भूमिकेवर भाजपाची काय प्रतिक्रिया?
आप पक्षाच्या या भूमिकेवर भाजपाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सय्यद शाहनवाझ हुसेन यांनी प्रतिक्रिया दिली. “बिहारमध्ये एकूण ४० जागांसाठी लोकसभेची निवडणूक होणार आहे. एनडीए या सर्वच्या सर्व जागा जिंकणार आहे. आप पक्ष बिहारमध्ये लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. आम्हाला आप पक्षाची कसलीही अडचण नाही. मात्र ज्या लोकांनी (राजद, जदयू) त्यांना बिहारमध्ये आणले, त्यांची मात्र अडचण वाढू शकते,” असे हुसेन म्हणाले.
राजद, जदयू पक्षांची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज यांनी आपच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. “इंडिया या आघाडीची स्थापना करत असता काही समान तत्त्वे ठरवण्यात आली आहेत. याच तत्त्वांच्या आधारावर ही आघाडी अस्तित्त्वात आलेली आहे. आपची ही सध्याची भूमिका बाजूला ठेवून आप पक्ष या सर्व तत्त्वांवर कायम राहील, अशी अपेक्षा आहे,” असे मनोज झा म्हणाले. तसेच जनता दल यूनायटेड (जदयू) पक्षाचे नेते नीजर कुमार यांनीदेखील आपच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाला स्वत:चा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. आम्हीदेखील आमचा पक्ष अन्य राज्यांत वाढवण्याचा प्रयत्न करतो. इंडिया आघाडीतील पक्षांचे राज्य पातळीवरील मतभेदांवर तोडगा काढला जाईल,” असे नीरज कुमार यांनी सांगितले.