दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. केजरीवाल यांना अटक झाल्यापासून दिल्लीसह देशाच्या इतर भागांत अनेक निदर्शने करण्यात आली. पक्षासह इंडिया आघाडीतील मित्र पक्षांनीदेखील या निदर्शनांमध्ये आपला सहभाग दर्शवला आणि केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध केला. परंतु, आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभेतील १० पैकी सात खासदार या निदर्शनांमध्ये अनुपस्थित राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय सिंह, संदीप पाठक आणि एन. डी. गुप्ता या तिघांना वगळता केजरीवाल यांच्या अटकेनंतर इतर सात खासदारांनी स्वतःला दूर ठेवले आहे. आपचे लोकसभेतील एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनीही नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांना आपच्या राज्यसभा खासदारांविषयी विचारले असता, “पक्ष यावर चर्चा करेल”, असे त्यांनी सांगितले.

तीन खासदारांची अटकेविरोधात परखड भूमिका

संजय सिंह सध्या जामिनावर बाहेर आहेत. अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांना एकाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. संजय सिंह केजरीवाल यांच्या अटकेचा जोरदार निषेध करताना दिसत आहेत. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक आणि पक्षाचे सर्वात ज्येष्ठ खासदार आणि कोषाध्यक्ष एन. डी. गुप्तादेखील केजरीवाल यांच्या अटकेविरोधात परखड भूमिका घेताना दिसत आहेत. गुप्ता सोशल माध्यमांवर सक्रिय नाहीत, मात्र ते पक्षाच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी होताना दिसतात. ३१ मार्चला रामलीला मैदानावरील महासभेत आणि ७ एप्रिलला जंतरमंतर येथे केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या उपोषणात त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला.

हेही वाचा : ‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?

सात राज्यसभा खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर गायब

राघव चढ्ढा

पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा नेहमीच सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसतात. ते आपच्या पत्रकार परिषदांचा चेहरा राहिले आहेत. गेल्या महिन्यात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ते लंडनला रवाना झाले. मुळात मार्चच्या अखेरीस ते भारतात परतणार होते, परंतु केवळ त्यांची पत्नी परिणीती चोप्रा तिच्या ‘चमकिला’ चित्रपटाच्या नेटफ्लिक्स प्रदर्शनासाठी परतली आहे. २१ मार्चला केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर चढ्ढा नियमितपणे आप प्रमुखांसह पक्षाच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत.

खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपला आणि संजय सिंह यांचा जुना फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी तुरुंगातून केजरीवाल यांनी दिलेल्या संदेशाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, तो व्हिडीओदेखील चढ्ढा यांनी रिपोस्ट केला.

राघव चढ्ढा नेहमीच सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

चढ्ढा यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना परतण्यास उशीर होत आहे. कारण- रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिल्यानंतर ते परत येतील आणि पक्षाच्या कार्यात सामील होतील.

स्वाती मालीवाल

दिल्लीतून पहिल्यांदाच खासदार झालेल्या स्वाती मालीवाल सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी पक्षाला सांगितले आहे की, त्यांची बहीण आजारी असल्याने त्यांना तिच्या जवळ थांबणे आवश्यक आहे. मालीवाल सोशल माध्यमावर पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा देणार्‍या पोस्ट करत आहेत. केजरीवाल यांच्या समर्थनार्थ अनेक ‘आप’ नेते बाहेर येत नसल्याचा आरोप भाजपाने केला होता. हा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मालीवाल म्हणल्या, “माझी बहीण गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. ती आजारी आहे आणि मी तिला आधार देण्यासाठी आले आहे. मी लवकरच परत येणार आहे आणि हुकूमशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी पक्षाबरोबर उभी राहणार आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. मी गेल्या २० वर्षांपासून अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढत आले आहे आणि पुढेदेखील लढत राहीन, असे त्या म्हणाल्या.

हरभजन सिंग यांचे मौन

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पंजाबचा राज्यसभा खासदार आहे. परंतु, खासदार झाल्यापासून ते फार क्वचितच पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसले. केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी अद्यापही मौन बाळगले आहे. त्यांच्या सोशल माध्यमांवरील बहुतेक पोस्ट सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर आधारित आहेत. २४ मार्चला त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांचे त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदन केले होते. आपच्या निदर्शनांमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता, ते केवळ नाही म्हणाले. या विषयावर ते फार काही बोलले नाही.

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पंजाबचा राज्यसभा खासदार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अशोक कुमार मित्तल

पंजाबस्थित लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि राज्यातील आपचे खासदार मित्तल हे देखील पक्षाच्या कार्यक्रमांमधून गायब होते. सोशल माध्यमांवर त्यांनी जिनिव्हा येथे २३ ते २७ मार्चदरम्यान झालेल्या आंतर-संसदीय संघ परिषदेबद्दल ट्विट केले. ते या परिषदे सहभागी झाले होते. मित्तल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मला पक्षाच्या आंदोलनाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. काय करायचे ते पक्षातील मुख्य नेते सांगतील.” मित्तल यांनी असा दावा केला की, पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलन कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले नाही.

संजीव अरोरा

पंजाबमधील आणखी एक खासदार अरोरा म्हणाले की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांनी २४ मार्चला सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली होती. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या महासभेत सहभागी न झाल्याचेही त्यांनी मान्य केले. अरोरा म्हणाले की, ते लुधियानामध्ये पक्षकार्यात व्यग्र असल्याने उपस्थित राहू शकले नाही. “मला दिलेली जबाबदारी मी नेहमीच पार पाडली आहे. राज्यसभेतील आमचे नेते एन. डी. गुप्ता यांच्याशी मी सतत संपर्कात आहे. जर मला आंदोलनासाठी उपस्थित राहण्यास सांगितले तर मी तिथे असेन”, असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर संजीव अरोरा यांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

बलबीर सिंह सीचेवाल

पर्यावरण कार्यकर्ते आणि पंजाबमधील आपचे राज्यसभा खासदार, सीचेवालदेखील पक्षाने केलेल्या आंदोलनांमध्ये दिसले नाही. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मी धर्माचा माणूस आहे आणि माझे मी कर्तव्य पार पाडत आहे. जर काही योजना असतील तर आम्ही नक्की कळवू.”

हेही वाचा : भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?

विक्रमजित सिंह साहनी

गेल्या काही दिवसांपासून साहनी हे आपच्या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित होते. त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेबद्दल अद्यापही मौन बाळगले आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आणि लेखक खुशवंत सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित एका मेळाव्यातील त्यांच्या संवादाचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत. सध्या ते मौन असले तरी साहनी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी आपली भूमिका ‘गैर-राजकीय’ असल्याचे अनेकदा सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap rajyasabha mp missing after kejriwal arrest rac