छत्रपती संभाजीनगर : आपल्या वर्तणुकीमुळे व वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत येणारे मराठवाड्यातील दोन मंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या कामामुळे आता चर्चेत आले आहेत. अवैध वाळू उपसा प्रकरणातील एका तक्रारीत कोटनांद्रा येथील सरपंच अर्जून बाबाराव गाडे यांना मंत्री सत्तार यांचे आर्शीवाद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संदिपान भूमरे यांची वादग्रस्त ध्वनिफितही चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर कोटनांद्रा येथे ५८३० ब्रास वाळूउपशास परवानगी असताना एक लाख ब्रासपेक्षा जास्त वाळूउपसा करण्यात आला आहे. पाच मीटरहून अधिक नदीतून वाळूउपसा करून गोपाबाई गोपीनाथ साबळे यांच्या शेतात ३५ हजार ब्रास व अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतात अवैध वाळूसाठा करण्यात आला आहे. वाळूची चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूच्या अवैध व्यावसायात मंत्री अब्दुल सत्तार यांचे अनेक कार्यकर्ते असून त्यांना मंत्र्यांचे आशीर्वाद असल्याची तक्रार संजय माणिकराव निकम व इतर ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अलिकडेच सिल्लोड येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीसाठी दानपत्र घेताना जवानांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकल्याची तक्रार करण्यात आली होती.

हेही वाचा >>> मनीषा कायंदेंविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका?

सिल्लोड नगरपालिकेच्या नऊ विकासकामांसाठी लागणारा वाळूसाठा उपलब्ध व्हावा म्हणून मुख्य अधिकाऱ्यांनी अटी व शर्तींचा भंग करून अधिक वाळूउपसा केला आहे. अवैध वाळूच्या व्यवसायात कृषिमंत्री सत्तार यांचे अनेक कार्यकर्ते असल्यामुळे अवैध वाळूउपसाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जाते. कोटनांद्रा येथील सरपंच अर्जुन बाबुराव गाडे हे सत्तार यांचे समर्थक असल्याचा दावा तक्रारदार संजय निकम यांनी केला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता

गर्भलिंग निदान प्रकरणात गाजलेले बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पाठवून भूम येथील ३० वर्षाच्या तरुणाने बुधवारी पहाटे आत्महत्या केली. फैय्याज दाऊद पठाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी यांच्या खासगी वाहनावर चालक होता. या डॉक्टरच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला. त्यानंतर फैय्याजने पानटपरी सुरू केली. पुन्हा कामावर ये अन्यथा स्वामी यांचे पैसे परत कर, अशी धमकी सुरेश कांबळे व त्याचे साथीदार देत होते. त्यातून ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते. सुरेश कांबळे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी फैय्याज पठाण यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. संदिपान भूमरे हे शिवीगाळ करीत असल्याची ध्वनिफित सध्या समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar and tanaji sawant sandipan bhumre three ministers from the shinde group in marathwada print politics news ysh
Show comments