छत्रपती संभाजीनगर : कोणाशी कसे बोलावे याचा तारतम्य भाव सोडून आपला भाेवताल वादाच्या रिंगणात विस्तारत जावा अशी कार्यशैली असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या कृषिमंत्री पदाच्या जमा-खर्चात सरकारची ‘नामी-बदनामी’ करणारा मंत्री अशी नोंद घ्यावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिमंडळात समावेशापूर्वी ‘टीईटी ’ घोटाळ्यात दोन्ही मुलींची नावे आल्यानंतर मंत्रिपदाबाबत साशंकता निर्माण झाली होती. पण मोठ्या शिताफीने सत्तार मंत्री झाले. त्यांच्या मंत्रिपदाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन यांचा समावेश असणाऱ्या खासगी व्यक्तींसह टाकलेल्या बियाणे कारखान्याच्या छाप्यामुळे त्यांच्या खात्याची तुलना आता विरोधक ‘गँग’ म्हणून करू लागले आहेत. आपणच तयार केलेले पथक कसे ‘वैध’ आहे, याचे खुलासे करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे सारे अशा काळात सुरू आहे जेव्हा कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला पदरचे पैसे आडत्याला द्यावे लागत आहेत. कापूसाचा भाव न वाढल्याने अनेकांच्या घरात कापूस पडून आहे. सोयाबीनचे दर वाढले नाहीत. कृषी विद्यापीठांमध्ये कमालीची मरगळ आहे. कृषी विभागातील बहुतांश मंडळी ‘बदली’च्या गुंत्यात एवढे अडकले आहेत की आपली बदली योग्य ठिकाणी व्हावी म्हणून मंत्र्यांच्या ११ हून अधिक स्वीय सहाय्यकांच्या गुंत्यात आपला वशिला कोठे लागतो का याची तपासणी सातत्याने सुरू आहे.

हेही वाचा – हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांचे पुत्र रिंगणात ?

वादच अधिक

एक रुपयात विम्याचा हप्ता आणि वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान हे निर्णय वगळता वर्षभरात सत्तार यांनी घेतलेले सर्व निर्णय वादातच अडकले. कधी ते बोलण्याने वाद वाढवून घ्यायचे तर कधी आपल्या नेत्याला खूश करण्याच्या नादात असे काही बोलून जायचे की, ते तर अडचणीत यायचेच पण त्यातून सरकारचीही बदनामी व्हायची. अतिवृष्टी आणि गोगलगायीच्या संकटानंतर राज्यात तब्बल ७२ हजार किलोमीटर फिरल्याचा दावा कृषिमंत्री सत्तार करतात. पण त्यांचे हे दौरे कृषी आणि सहकार क्षेत्रातील निर्णय घेण्यास उपयोगी पडले का, याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देता येणार नाही. सत्तार म्हणजे वादग्रस्त वक्तव्याचे भंडार. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दारू पिता का, हा साऱ्यांसमोर विचारलेला प्रश्न तर भन्नाटच होता. एखाद्या मंत्र्यांनी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास असे प्रश्न जाहीरपणे विचारल्याने मंत्री म्हणून त्यांच्या कार्यशैलीतील ‘सैल’पणा राज्यातील अनेकांच्या लक्षात आला.

शिवसेनेतील फुटीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करताना अब्दुल सत्तार हे जणू स्थापनेपासून शिवसैनिक असल्याच्या थाटात भाषणे देत होते. फुटीनंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते कसे आहेत, हे ते सांगू लागले. आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाच्या बदल्यात आपण ठरविलेल्या नेत्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची पद्धत त्यांनी एव्हाना रुजवली होती. शहरात येणाऱ्या मंत्र्याच्या गाडीवर हजारो लोक फुलांच्या पाकळ्याची उधळण करतात. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांच्यावर केलेला हा प्रयोग पुढे एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आला. मतदारसंघातील गर्दी आणि फुलांचा वर्षाव पाहून मुख्यमंत्री भारावले. मग पूर्वी स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे सुनील चव्हाण यांची कृषी आयुक्त म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली. मग सिल्लोड येथे राज्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कृषी महोत्सवात मग मनोरंजनाचेही कार्यक्रम आखण्यात आले. त्याला तिकिटे लावण्यात आली. सिल्व्हर, गोल्डन, प्लॅटिनमचे दर होते पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत. मग पुन्हा कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले, टीका झाली आणि निर्णय मागे घेण्यात आला. मग पुढे मंत्रिमंडळात निर्णय होण्यापूर्वीच तो जाहीर करण्यावरून त्यांची उपमुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केली.

हेही वाचा – भंडाऱ्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी!

माध्यमांमध्ये आपण कोणत्याही कारणाने राहिले तरी चालते, अशी सत्तार यांची धारणा असल्याने ते बोलण्यातील तारतम्य भाव सोडतात. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेकीपर्यंतचे आंदोलन झाले. पण अशा आंदोलनांमुळे सरकारच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होत असतो, हे सत्तार यांच्या गावीही नसते. त्यामुळे कधी एकनाथ शिंदे, कधी राधाकृष्ण विखे हेच आपले नेते आहेत, असे सांगत वरिष्ठ नेत्यांशी मैत्री करायची आणि त्या जोरावर प्रशासकीय पातळीवरील निधीच्या हालचाली घडवून आणायच्या ही सत्तार यांची खासियत म्हणावी लागेल. केंद्रीय पातळीवर ‘मिलेट्स’ची चर्चा सुरू झाली आणि कृषिमंत्री आणि कृषी आयुक्ताचा एक परदेश दौरा पूर्ण झाला. या वर्षीच्या हंगामात कडधान्य पेरा, त्याची बाजारपेठ वगैरे अशा चर्चा काही झाल्या नाहीत. काम कमी, वाद जास्त अशी सत्तार यांच्या जमाखर्चांची मांडणी करता येईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar minister who is constantly in the news and trouble the state government because of his statements print politics news ssb