तृणमूल काँग्रेसमधील नंबर ‘दोन’चे नेते अशी ओळख असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे त्यांच्या आत्याचे म्हणजेच ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात आहे. पक्षात अभिषेक यांच्या उदयानंतर काही जेष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र दुसऱ्या बाजूला पक्षातील काही नेते अभिषेक यांना पक्षांतर्गत अडचणीतून बाहेर येण्यासाठी सहकार्य करत आहेत. अभिषेक यांची प्रतिमा लोकांमध्ये आणि पक्षात मजबूत करण्याचा त्या नेत्यांचा प्रयत्न आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर अभिषेक हे करोना व्यवस्थापनाच्या कामात सक्रिय झाले. त्यांनी त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक ब्लॉक, म्युनिसिपल वॉर्ड आणि पंचायत विभागामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना केली. पाच ब्लॉक्समध्ये ‘डॉक्टर ऑन व्हील’ ही योजना कार्यान्वयीत केली. अभिषेक यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे त्यांच्या मतदार संघातील करोना पॉजेटीव्ह रेट हा दोन आठवड्यांमध्ये २० टक्क्यांवरून एका टक्क्यावर आला.
अभिषेक यांचे करोना व्यवस्थापनाचे हे मॉडेल ‘ डायमंड हार्बर’ मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या करोना व्यवस्थापन मोहिमेमुळे लोकांमधील अभिषेक यांची प्रतिमा उंचावली. एप्रिलमध्ये बंगाली नवीन वर्षाच्या महूर्तावर त्यांनी त्यांच्या मतदार संघात ‘डायमंड हार्बर फुटबॉल क्लब’ची स्थापना केली. फुटबॉल क्लबची घोषणा करताना ते म्हणाले की ” फुटबॉल हा खेळ आहे. तुम्ही तृणमूल कॉंग्रेस, भाजपा किंवा इतर कुठल्याही पक्षात असला तुमचे इथे स्वागत आहे. तुम्ही राजकारणात असाल किंवा नसाल तरी तुमचे इथे स्वागतच केले जाईल. इथे कुठल्याही पक्षाची, जातीची किंवा धर्माची सीमा असणार नाही. अभिषेक यांनी नुकतीच त्यांच्या मतदार संघातील लोकांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. ‘एक डाके अभिषेक’ असं या हेल्पलाईनचे नाव असून ममता बॅनर्जी यांच्या ‘ दीदी के बोलो’ या हेल्पलाईनवर ती आधारित असणार आहे. त्यांनी त्यांच्या लोकसभेतील आठ वर्षांच्या कामगिरीवर आधारित ‘निशब्दो बिप्लब’ हा कार्यअहवाल प्रसिद्ध केला आहे.
मात्र अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी पुढील राजकीय प्रवास म्हणावा तितका सोपा नसणार आहे. कारण कथित कोळसा घोटाळा प्रकरणात अभिषेक आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. ते सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकवेळा पक्षाच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतलेली पहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षातील घराणेशाहीबाबत विधान केले होते. ममता बॅनर्जी यांनी यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करत त्यांना उत्तर देणे टाळले होते. पक्षातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार ते पक्षात नंबर दोनचे नेते आहेतच मात्र त्यांना ते एक उत्तम प्रशासक असल्याचे सिद्ध करावे लागेल. आणि म्हणूनच ते ‘डायमंड हर्बर’ हे एक आदर्श मॉडेल म्हणून सादर करत आहेत.