मुंबई : मुंबईतील अनेक भूखंड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बळकावले असून धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुसऱ्या मुलाचे निसर्ग व प्राणीप्रेम दाखवून हडप करायचा असल्याने धारावीकरांची माथी भडकविली जात आहेत. आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

धारावी पुनर्विकासाला ठाकरे यांचा विरोध आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, धारावीमध्ये ७० टक्के दलित, मुस्लीम आणि मराठी माणसे असून त्यांना हक्काची घरे मिळणार आहेत. महापालिकेला १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईकरांना ४३० एकरमधील ३७ टक्के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान आदी कारणांसाठी मोकळी जागा मिळणार आहे. एक वाहतूक टर्मिनलही याच परिसरात उभारले जाईल. धारावीकर, मुंबईकर, महापालिका आणि शासन यांचा फायदा होणार असताना ठाकरे यांचा प्रकल्पास विरोध का? हा एक आंतराष्ट्रीय कट असून आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत. धारावीमध्ये केवळ २० हजार घरांचे सर्वेक्षण झाले असून २००० आधीची, २००० ते २०११ आणि त्यानंतरची किती, निवासी घरे व औद्याोगिक गाळे किती आदी गोष्टी सर्वेक्षणानंतर दिसून येतील. २६० एकर जागा घरे बांधण्यासाठी उपलब्ध होणार असून ठाकरेंचा विरोध कशासाठी, असा सवाल शेलार यांनी केला.