कर्नाटकचे माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी त्यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष भाजपामध्ये विलीन करीत पक्षात पुनरागमन केले आहे. जी. जनार्दन रेड्डी २००८ ते २०१३ दरम्यान कर्नाटकमधील भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री होते. याचदरम्यान त्यांच्यावर बेकायदा खाण घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले होते. तसेच सीबीआयने नऊ प्रकरणांवरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. जी. जनार्दन रेड्डी यांच्या भाजपातील प्रवेशानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
२०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर कर्नाटकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाने जी. जनार्दन रेड्डी यांना पुन्हा पक्षात घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. रेड्डी हे कल्याण राज्य प्रगती पक्षाचे एकमेव आमदार आहेत.
हेही वाचा – ३३ वर्षांनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभा निवडणूक लढवणार; गमावलेला गड काँग्रेसला परत मिळणार का?
सोमवारी भाजपाप्रवेशानंतर रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या विलीनीकरणाचा आग्रह धरला. त्यामुळेच आम्ही आमचा पक्ष भाजपामध्ये विलीन केला आहे”, अशी प्रतिक्रिया रेड्डी यांनी दिली. यावेळी बोलताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, “जनार्दन रेड्डी यांच्या पुनरागमनामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीसाठी मोठा फायदा होईल.”
रेड्डी यांच्या प्रवेशानंतर भाजपाला बल्लारी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांत फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषत: रेड्डी यांचे सहकारी श्रीरामुलू यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपाला होईल, असे सांगितले जात आहे. २००४ ते २०१३ या काळात बल्लारीमध्ये जनार्दन रेड्डी यांची असलेली पकड आणि श्रीरामुलू यांची लोकप्रियता हे भाजपाच्या यशाचे मुख्य घटक होते.
दरम्यान, २००८ ते २०१३ या काळात जनार्दन रेड्डी यांचे भाऊ जी. सोमशेखर रेड्डी आणि जी. करुणाकर रेड्डी हे दोघेही अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभेवर निवडून आले होते. या काळात या दोघांनी अवैधरीत्या लोह खनिज विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी २०१०-२०११ मध्ये लोकायुक्तांनी अहवालही सादर केला होता. त्यानुसार २००६ ते २०११ या काळात रेड्डी बंधूंशी संबंधित माफियांनी कर्नाटकातून १२ हजार २२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लोह खनिजाची बेकायदा निर्यात केल्याचे सांगण्यात आले होते. लोकायुक्तांच्या अहवालानंतर दोन महिन्यांनी जनार्दन रेड्डी यांना सीबीआयने अटक केली होती. एक वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. तसेच बल्लारी प्रदेशात प्रवेश करण्यास मनाई केली होती.
यादरम्यानच्या काळात रेड्डी हळूहळू भाजपापासून दूर होत गेले. तसेच त्यांनी २०२२ मध्ये कल्याण राज्य प्रगती पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनेही त्यांचा पाठिंबा मागितला होता. विशेष म्हणजे काँग्रेसच्या काळातच त्यांच्यावरील अवैध खाण घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा – गोव्यात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत पल्लवी डेम्पो?
२०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखल केल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रेड्डी यांच्यावर जवळपास २० गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी नऊ गुन्हे अवैध खाण घोटाळ्याशी संबंधित आहेत. २००४ पासून जनार्दन रेड्डी गटाचे बल्लारीच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत बल्लारीमधून काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी रेड्डी बंधूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना या भागात प्रसिद्धी मिळाली होती.