मुंबई : विधान परिषदेत विरोधात मतदान केलेल्या आमदारांच्या विरोधात पक्षाने कारवाई केली असून, भविष्यात काय कारवाई केली हे स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी शुक्रवारी सांगितले असले तरी पक्षाने या आमदारांची नावे जाहीर करण्याचे टाळले. फुटीरांमधील दोन नावांमुळे पक्षाची पंचाईत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याचा संशय आहे. विरोधात मतदान केलेल्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. पण आठवडा उलटला तरी कारवाईबाबत पक्षाकडून अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ आणि पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. फुटीर आमदारांच्या विरोधातील कारवाई जाहीर केली जाईल, अशी प्रदेश पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती.
हेही वाचा >>>मतदान केंद्रात केवळ १५०० पर्यंतच मतदार; निवडणूक आयोगाची सूचना
‘फुटीर आमदारांची नावे आम्हाल समजली आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे. ही कारवाई काय करण्यात आली हे लवकरच समजेल, असे मोघम उत्तर के. सी. वेणूगोपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिले. एरव्ही कारवाई झालेल्या आमदारांची नावे जाहीर करून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली जाते. पण आज फक्त कारवाई झाली एवढेच वेणूगोपाळ यांनी सूचित केले. पण नेमकी कोणत्या आणि किती आमदारांच्या विरोधात कारवाई झाली याची माहिती देण्याचे टाळण्यात आले.
बड्या नेत्याचे नाव?
आमदारांच्या विरोधात कारवाई झाली आणि बेशिस्त पक्षात खपवून घेणार नाही, असे वेणूगोपाळ सांगत असले तरी आमदारांची नावे जाहीर करण्याचे टाळण्यात आले. यामागे दोन संशयित आमदारांच्या नावांमुळे काहीशी अडचण झाल्याचे समजते. एका बड्या नेत्याचे नाव आल्याने या आमदारांची नावे जाहीर करणे पक्षाला अडचणीचे ठरत असल्याची माहिती पक्षातील सूत्राने दिली.