संजीव कुळकर्णी
नांदेड: खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे सोमवारी महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मराठी रुचकर पदार्थांच्या भोजन व्यवस्थेमुळे सर्व भारतयात्री तृप्त झाल्याची भावना श्रावण रॅपनवाड यांनी व्यक्त केली. खासदार गांधी व त्यांच्यासोबतच्या १३० भारतयात्रींचे सोमवारी रात्री देगलूरला आगमन झाले. या भारतयात्रींच्या निवास व्यवस्थेकरिता ६२ कंटेनर्स यात्रेमध्ये असून त्यात आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. राहुल यांची व्यवस्था एका स्वतंत्र वातानुकुलित कंटेनरमध्ये आहे. त्यात शयनकक्ष, प्रसाधनगृह यासह कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक त्या व्यवस्थाही करण्यात आलेल्या आहेत. इतर भारतयात्री तसेच राहुल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ३६ अधिकारी-कर्मचारी, तांत्रिक व इतर कामे सांभाळणारे कारागीर व सेवक अशांच्या स्वतंत्र व्यवस्थेच्या निमित्ताने मुक्कामाच्या ठिकाणी अवघ्या काही तासांत एक स्वतंत्र वसाहतच निर्माण होत असल्याचे दिसून आले.
यात्रेच्या मुक्कामाची ठिकाणे निश्चित करताना राहुल यांच्या यंत्रणेने प्रत्येक स्थळाची आधी पाहणी केली. ६२ कंटेनर्स उभे करण्यासाठी आवश्यक ती जागा तसेच तंबू व शेडसाठी आवश्यक तेवढी जागा निश्चित करून देण्यात आली होती. त्याप्रमाणे देगलूर, शंकरनगरपासूनच्या सर्व मुक्कामाच्या ठिकाणी नियोजन केले गेले. त्यात आतापर्यंत कोठेही मोठ्या अडचणी उद्भवल्या नसल्याचे भारतयात्रींतर्फे सांगण्यात आले.
यात्रेच्या प्रत्येक मुक्कामस्थानी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. राहुल गांधी व इतर भारतयात्रींच्या मुक्काम परिसरात ‘कॅम्प-ए’, महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असलेल्या प्रदेशयात्रींच्या मुक्कामस्थानाला ‘कॅम्प-बी’ तर स्थानिक व इतरांच्या व्यवस्था ठिकाणाला ‘कॅम्प-सी’ असे नामकरण करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शंकरनगर येथे भास्करराव खतगावकर यांच्या यंत्रणेने तब्बल ५ हजार लोकांच्या जेवणाची तयारी केलेली होती.भारतयात्रींच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था त्यांच्या कॅम्पमध्येच करण्यात आलेली असली तरी त्यांच्या भोजनातील खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्थानिक संयोजकांनीच व्यवस्था केली आहे. या कॅम्पमधील मांसाहारी भोजनातील विविध प्रकार करण्यासाठी तुळजापूर येथून काही स्वयंपाकींना पाचारण करण्यात आले आहे. मंगळवारच्या भोजनात भारतयात्रींसाठी मटण आणि खिमा असा बेत होता. यात्रींपैकी रॅपनवाड यांनी सांगितले की, गेले दोन महिने मैदाच्या चपात्या किंवा तंदूर रोटी तसेच तांदळाचे भातासह इतर पदार्थ असायचे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्याच दिवशी या यात्रींना गव्हाच्या पोळ्या आणि भाकरी जेवणामध्ये मिळाल्या.
हेही वाचा : अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता
शंकरनगरच्या दोन कॅम्पमधील भोजन व्यवस्थेचे नियोजन भास्करराव खतगावकरांच्या स्नुषा डॉ.मीनल खतगावकर यांनी केले होते. तर ‘कॅम्प-ए’ मध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुक्कामस्थळी आल्यास या कॅम्पमधील भोजनात त्यांनाही सहभागी करून घेतले जाते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी बुधवारी नायगावजवळच्या मुक्कामात राहुल यांची भेट घेतली. नांदेडमधील प्रख्यात केटरर दडू पुरोहित यांच्यावरही भोजन व्यवस्थेची मोठी जबाबदारी असून त्यांनीही आपली मोठी यंत्रणा ठिकठिकाणी उभी केली आहे.