Actor Vijay Political party: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता विजयने अखेर राजकीय पक्षाची स्थापना करून रविवारी (२७ ऑक्टोबर) त्याच्या तमिलगा वेत्री कळघम (Tamilaga Vettri Kazhagam) या पक्षाची पहिली परिषद घेतली. विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे विजयच्या पक्षाची सभा घेतली गेली. या सभेला तीन लाख लोक जमले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजयच्या राजकारणातील प्रवेशाबाबत तमिळनाडूमधील प्रस्थापित पक्षांनी मात्र वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. थलपती (कमांडर) या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजयने पक्षाच्या पहिल्या परिषदेत पक्षाची विचारधारा स्पष्ट केली. तसेच आपले राजकीय शत्रू कोण आहेत, याचीही माहिती दिली. विजयचा पक्ष २०२६ मध्ये होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढविण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके)च्या पहिल्या परिषदेत बोलत असताना विजयने भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका केली. तसेच त्याचा पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा आहे. द्रविडम आणि राष्ट्रवाद हे आपल्या विचारधारेचे दोन महत्त्वाचे पैलू असल्याचेही त्याने सांगितले. तसेच तमिळनाडूचे महापुरुष पेरीयार यांचा देवांचा विरोध सोडून त्यांची विचारसरणी आपण स्वीकारत आहोत, असेही विजय याने सांगितले.

तमिळनाडूमध्ये आधीच दोन प्रमुख द्राविडीयन पक्ष आहेत. त्यापैकी द्रमुक (DMK) यांचा पक्ष सत्तेत असून अण्णा द्रमुक (AIADMK) पक्ष हा प्रमुख विरोधक आहे. तमिळनाडूसारख्या राजकीय दृष्टीने गजबजलेल्या राज्यात विजयच्या प्रवेशामुळे आता आणखी काय फरक पडणार याकडे लक्ष लागले आहे. द इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी राजकीय विश्लेषण करणारा एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच इतर राजकीय पक्षांना काय वाटते, याचाही आढावा घेतला आहे.

हे वाचा >> तमिळ स्टार ‘थलापथी’ विजयची राजकारणात एंट्री; विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

j

अण्णा द्रमुक पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मंत्री इ. के. पलानीस्वामी (इपीएस) यांनी म्हटले की, विजयच्या टीव्हीके पक्षाचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही. ते आमची मते खाणार नाहीत. “विजयच्या पक्षामुळे अण्णा द्रमुकच्या मतांवर काहीही फरक पडणार नाही. आम्ही आमच्या विचारधारेवरून कधीही बाजूला हटलो नाहीत. तसेच २०२६ साली निवडणूक जवळ आल्यानंतर तेव्हाची राजकीय परिस्थिती पाहून राजकीय निर्णय घेतले जातील,” असेही त्यांनी सांगितले.

द्रमुककडून सावध पवित्रा

दुसरीकडे द्रमुकने मात्र विजयच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य करणे टाळले आहे. विजयने आपल्या भाषणात एम. के. स्टॅलिनच्या सरकारने राबवविलेल्या द्राविडीयन मॉडेलवर टीका केली. तसेच द्रमुकचे सरकार भ्रष्टाचार युक्त असून ते फक्त फॅसिझमच्या विरोधात लढण्याची घोषणा करतात, मात्र त्यांच्याकडून कृती होत नाही, असाही आरोप केला आहे. द्रमुकचे संघटक सचिव आर. एस. भारती आणि पक्षाचे नेते ईव्हीकेएस इलांगोव्हन यांनी विजयचे आरोप फेटाळून लावले. ज्या झाडाला फळे असतात, त्याच झाडाला दगडे मारली जातात, असे भारती म्हणाले; तर विजयचा पक्ष आमचीच धोरणे चोरून दाखवत असल्याचा आरोप इलांगोव्हन यांनी केला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते व उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी विजयच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य करणे टाळले. विजयचे भाषण ऐकल्यानंतर आपण त्यावर प्रतिक्रिया देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला.

भाजपाने काय प्रतिक्रिया दिली

विजयने जातीयता आणि फुटीरतावादी विचारांवर केलेल्या प्रहारावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रीय मुद्द्यांबाबत विजयची समज अपरिपक्व असल्याचा शेरा त्यांनी दिला. ते म्हणाले, इतर विरोधकांप्रमाणेच विजय आमच्यासाठी विरोधक असेल. त्याच्या राजकीय भवितव्याबाबतही अद्याप साशंकता आहे, असेही ते म्हणाले.

राजकीय जाणकारांना काय वाटतं?

तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील अनेक जाणकारांनी विविध मते व्यक्त केली आहेत. अनेकांना वाटते की, विजयने अण्णा द्रमुक पक्षावर फारशी टीका केलेली नाही, याचा अर्थ त्यामुळे अण्णा द्रमुक पक्षासाठी त्याचा पक्ष भाजपा आणि द्रमुकपेक्षा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला अण्णा द्रमुकच्या अनेक नेत्यांनी विजयच्या महा परिषदेवर थेट भाष्य करणे टाळले आहे.

सरकारमधील एका मंत्र्याने विजयच्या राजकीय वाटचालीबाबत भाष्य करताना म्हटले की, विजयची राजकारणातील एंट्री ही एखादी ठरवून केलेली कृती वाटते. विजयला आगामी काळात या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जर तो भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, तर मग काही वर्षांपूर्वी त्याच्या गुंतवणुकीच्या मुद्द्यावर ईडीने त्याची चौकशी का केली? जर तो घराणेशाहीच्या विरोधात आहे, तर मग त्याचे वडील दिग्दर्शक असल्यामुळे त्याचे करियर मार्गस्थ लागले, हे चूक आहे का? तसेच विजयच्या मुलाला लहान वयातच दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी कशी काय मिळाली?

सरकारमधील सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, राजकारणात वावरत असताना विजयला वरील प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मुळात हे प्रश्न किंवा उत्तर महत्त्वाचे नसून विजय राजकारणात सातत्य ठेवणार का? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तो त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघेल आणि थेट जानेवारीत परत येईल. मोठी सभा घेतल्यानंतर आता थेट पोंगलच्या शुभेच्छा देईल. विजयला राजकारणात टीकायचे असेल तर खडतर प्रवास करावा लागेल. लोकांशी थेट संपर्क न ठेवता, आपली उच्च खासगी जीवनशैली उपभोगत राजकारणात बाजी मारता येईल, असे जर विजयला वाटत असेल तर त्याचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल.