काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. भारत जोडो यात्रेच्या यशामुळे देशातील अनेक नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी अद्याप तसे काहीही केलेले नाही. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी आपापसात सहमती आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ निर्णयाने बिहार सरकारच्या जात सर्वेक्षणाला मान्यता?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील, असे ममता बॅनर्जी काहीही करणार नाहीत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच अनेकांनी या यात्रेचे कौतुक केलेले आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी अद्याप तसे काहीही केलेले नाही. जेव्हा मोदी आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे असे म्हणतात, तेव्हाच ममता बॅनर्जी यादेखील काँग्रेसला पश्चिम बंगालधून बाहरे काढले पाहिजे, असे म्हणतात. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात परस्पर सहमती आहे,” असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे ईडी आणि सीबीआयपासून संरक्षण व्हावे यासाठी मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सहमती झालेली आहे, असे याआधी अधीर रंजन चौधरी म्हणाले होते. “ममता बॅनर्जी यांच्याकडून मोदी यांना वेगवेगळी माहिती पुरवली जाते. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी ममता बॅनर्जी ही माहिती देतात. तृणमूलच्या नेत्यांना ईडी, सीबीआयपासून वाचवण्यासाठी बॅनर्जी यांनी मोदींपुढे मान झुकवलेली आहे,” असा आरोप याआधीही अधीर रंजन चौधरी यांनी केलेला आहे.
हेही वाचा >>> महिलांना प्रतिमहिना २००० रुपये देऊ, कर्नाटकात काँग्रेसचे आश्वासन; पंजाब, हिमाचलमधील आश्वासनांची काय स्थिती?
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची येत्या ३० जानेवारी रोजी सांगता होणार आहे. काँगेसच्या श्रीनगर येथील मुख्यालयात राहुल गांधी तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर ही यात्रा संपुष्टात येईल. यावेळी काँग्रेस मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने वेगवेगळ्या २१ विरोधी पक्षांना निमंत्रित केलेले आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचाही समावेश आहे.