पश्चिम बंगालमधील काँग्रेसची अवस्था फारच बिकट आहे. विशेषकरून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे राज्यातील काँग्रेसचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा सोपविल्यानंतर काही तासांतच अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यावरून तृणमूल काँग्रेसवर आगपाखड करणाऱ्या काही पोस्ट्स केल्या आहेत. अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी रात्री केलेल्या या पोस्ट्समध्ये म्हटले आहे, “तृणमूल काँग्रेसकडून रात्रंदिवस हल्ले झेलत असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांसाठी मी बोललो नाही, तर मग कोण बोलणार?” पुढे त्यांनी म्हटले, “दररोज सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून आमचा पक्ष तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडीचा भाग असूनही आमच्यावर हल्ले आणि अत्याचार करण्याचे त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत. अगदी आजही आमच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या खटल्यांमध्ये गोवण्यात आले असून, तुरुंगात डांबण्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला आमची पक्षकार्यालये हिसकावून घेतली जात आहेत. जर मी शांत बसलो, तर तो आमच्या पक्षकार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा