ओम राऊत यांनी दिग्दर्शितक केलेल्या आदिपुरूष या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता होती. हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, या चित्रपटातील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. राजकीय वर्तुळातही चित्रटपावर आक्षेप घेण्यात आले आहेत. काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी या चित्रपटांना पाठिंबा देणारा भाजपा पक्ष आदिपुरूष चित्रपटातील चुकांवर का बोलत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आदिपुरुषवर बंदी घालावी’

काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी आदी पक्षाच्या नेत्यांनी आदिपुरुष या चित्रपटावर आक्षेप व्यक्त केला आहे. या चित्रपटामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी भाजपाच्या नेत्यांनी मदत केलेली आहे, असा आरोप या पक्षांकडून करण्यात आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तर आदिपुरूष चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

‘भगवान हनुमानाच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद’

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. तसेच आदिपुरूष चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. “या चित्रपटात अत्यंत असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. या भाषेमुळे लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. धर्म आणि धर्माचा व्यवसाय यात फरक आहे. चित्रपटाच्या लेखकाने भगवान हनुमानाच्या तोंडी ‘तेरे बाप की जली’ अशा प्रकारचे संवाद घातले आहेत. हे अतिशय घाणेरडे संवाद आहेत,” असे श्रिनेत म्हणाल्या.

हेही वाचा >>> मध्य प्रदेशमध्ये तीन वर्षांत फक्त २१ जणांना सरकारी नोकरी? प्रियांका गांधींच्या दाव्याने खळबळ!

‘देवांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न’

भूपेश बघेल यांनीदेखील या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. “आपल्या सर्व देवतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण प्रभू राम आणि भगवान हनुमानाचे कोणताही अविर्भाव नसेलेल चेहरे पाहिलेले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी प्रतिक्रिया बघेल यांनी दिली.

‘प्रभू राम मर्यादा पुरुषोत्तम, चित्रपटात मात्र…’

“भगवान हनुमानाला ज्ञान, भक्ती, शक्तीचे प्रतिक म्हटले जाते. आमच्या लहानपणापासून आम्ही हेच ऐकत आलो आहोत. या चित्रपटात प्रभू रामाला एक योद्धा म्हणून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील भाषा आणि संवादामध्ये सभ्यपणा नाही. तुलसीदास यांच्या रामायणात प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे,” अशी टीका बघेल यांनी केली.

“पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी रामानंद सागर यांना रामायणावर आधारित एका अजरामर मालिकेची निर्मिती करण्यास सांगितले होते. ही मालिका नंतर खूप प्रसिद्ध झाली. आदिपुरुष चित्रपटात प्रभू राम आणि हनुमानाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून तरूण पिढीला काय शिकायला मिळणार आहे?” असा सवालही भूपेश बघेल यांनी केला.

हेही वाचा >>> “सुडाचे दुसरे नाव म्हणजे मोदी!” नेहरूंचे १६ वर्षे वास्तव्य असलेल्या वास्तूचे नाव बदलल्यामुळे काँग्रेस आक्रमक, भाजपावर सडकून टीका

“भाजपा पक्ष स्वत:ला धर्माचा रक्षक असल्याचा दावा करतो. मग जे लोक काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी अशा चित्रपटावर बोलतात ते आदिपुरूष चित्रपटातील चुकांवर का गप्प आहेत,” असेही बघेल यांनी भाजपाला विचारले.

तुम्ही सर्वच मर्यादांचे उल्लंघन केले- प्रियांका चतुर्वेदी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीदेखील या चित्रपटावर आक्षेप व्यक्त केला आहे. “आदिपुरूष चित्रपटाचे संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांनी देशाची माफी मागायला हवी. मनोरंजनाच्या नावाखाली देवांच्या तोंडी अशा प्रकारचे आक्षेपार्ह संवाद घातल्यामुळे प्रत्येक भारतीयाला दु:ख होत आहे. तुम्ही मर्यादा पुरूषोत्तम प्रभू राम यांच्यावर आधारित चित्रपट केला आहे. मात्र चित्रपटाने कमाई करावी म्हणून तुम्ही सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले आहे. हे कधीही मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतली.

‘भाजपाच्या नेत्यांनी देशाची माफी मागायली हवी’

यासह चतुर्वेदी यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये चित्रपट निर्मात्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे आभार मानले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे आभार मानले आहेत. या सर्व नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी. कारण या सर्वांनी चित्रपट निर्मितीसाठी सहाय्य केलेले आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >>> मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्ये काबीज करण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’, उभी केली तीन हजार कार्यकर्त्यांची फौज!

‘प्रभू राम, सीता माता, भगवान हनुमान यांचा अपमान करण्यात आला’

आपचे नेते संजय सिंह यांनीदेखील आदिपुरुष चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये भाजपा नेत्यांचा समावेश आहे. या चित्रपटामुळे हिंदू धर्म आणि हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला आहे, असे संजय सिंह म्हणाले आहेत. “भाजपा नेत्यांनी हा चित्रपट तयार केला आहे. योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहरलाल खट्टर आदी नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम, सीता माता, भगवान हनुमान या सर्व देवतांचा अपमान करण्यात आला आहे. या चित्रपटात आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचा रामचरितमानस आणि रामायणाशी काहीही संबंध नाही,” असे संजय सिंह म्हणाले आहेत.

‘कल्पनेच्या आधारावर आता रामायणामध्ये बदल केला जाणार का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही संजय सिंह म्हणाले. “भाजपाचा प्रभू राम आणि सामान्य जनतेशी काहीही संबंध नाही. ते फक्त देवाचा आणि सामान्य माणसांचा उपयोग करतात. या चित्रपटात अनेक काल्पनिक गोष्टी आहेत. कल्पनेच्या आधारावर आता रामायणामध्ये बदल केला जाणार का? भाजपाचे लोक हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे नव्हे तर हिंदू धर्म नष्ट करणारे आहेत,” अशी टाकी संजय सिंह यांनी केली.

हेही वाचा >>>भाजप आणि शिंदे यांच्यातील जाहिरात वादात बच्चू कडूही

‘आदिपुरुष चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते रोखावे’

विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटावर भाजपाचे प्रवक्ते प्रविण शंकर कपूर यांनीदेखील आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून सेन्सॉर बोर्डाने त्याचे पुन्हा एकदा परीक्षण करायला हवे, असे प्रविण शंकर कपूर म्हणाले आहेत. “आदिपुरूष चित्रपटाला सर्वत्र विरोध केला जात आहे. त्यामुळे आक्षेपार्ह दृष्य आणि संवादाचे पुन्हा एकदा परीक्षण करायला हवे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरत रोखायला हवे,” अशी भूमिका कपूर यांनी घेतली आहे.

दरम्यान या चित्रपटाची निर्मिती टी सीरीजने केली असून चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये आहे. चित्रपट प्रदर्शित करताना टी सीरीजने आम्ही प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवणार आहोत, असे जाहीर केले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush film controversy opposition leader demands bjp apology ban on film prd
Show comments