समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची नात व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची मुलगी अदिती यादव लवकरच राजकारण प्रवेश करू शकते, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. ३ एप्रिलला अदिती यादव पहिल्यांदाच त्यांच्या आई व मैनपुरी येथील समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यासोबत दिसल्या होत्या. आई-मुलीच्या संसदेत येण्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावरून अदिती तिच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जर तिने सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर ती २०२९ च्या निवडणुकीतून पदार्पण करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोण आहे अदिती यादव?
अदिती यादव ही अखिलेश आणि डिंपल यादव यांच्या तीन मुलांपैकी सर्वांत मोठी मुलगी आहे. तिला टीना व अर्जुन अशी दोन लहान जुळी भावंडं आहेत. अदितीने तिचे शालेय शिक्षण लखनऊमधील ला मार्टिनियर गर्ल्स कॉलेजमधून पूर्ण केले आहे. २०२० मध्ये १२ वीच्या परीक्षेत ती ९८ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. ती सध्या जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे राजकारण आणि परराष्ट्र संबंध या विषयाचे शिक्षण घेत आहे. त्याव्यतिरिक्त अदिती एक कुशल घोडेस्वार आहे. तिने राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत अनेक पदकेही जिंकली आहेत. तिला बॅडमिंटनचीही आवड आहे. अदिती शैक्षणिक, क्रीडा, कौशल्य या सर्वांमध्ये अव्वल आहे.

राजकीय शिकवण
अदितीचे आजोबा मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तिची राजकारणाशी ओळख झाली. त्यावेळी मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान ती आई डिंपल यादव यांच्यासह उपस्थित होती. डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून लढत होत्या. आईसोबत प्रचार करताना अदितीने उत्तमरीत्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. तिने मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली होती तसेच तिने ग्रामीण भागातील महिलांशी संवादही साधला होता. नुकत्याच झालेल्या २०२ च्या लोकसभा निवडणुकीतही अदितीची उपस्थिती ठळकपणे दिसून आली. या निवडणुकांदरम्यान अदिती सुलतानपूरमध्ये तिच्या आईसोबत ग्रामीण महिलांमध्ये बसून शांतपणे प्रचाराचे काम करताना दिसली होती. त्यानंतर काही दिवसांनी ती रस्त्यावर तिच्या आईच्या भाषणाबाबतची पत्रके वाटतानाही दिसली होती.

पालकांचे मत काय?
राजकारणातील अदितीच्या संभाव्य प्रवेशाबाबत बोलताना तिचे वडील व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अलीकडेच मुलाखतीत म्हटले, “माझ्या मुलीला राजकारण काय आहे हे माहीत असलं पाहिजे. आम्ही तिला थांबवलेलं नाही. ती ग्रामीण भागात जाऊन लोकांना भेटते आणि लोकांच्या समस्या, वेदना समजून घेते. ते गरजेचं आहे.” “तिन्ही मुलांना सोशल लाईफ समजून घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं”, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, “जेन-झी ला राजकारण समजणं गरजेचं आहे. मी त्यांना वेळ देतो, त्यांना मार्गदर्शनही करतो.”

अदितीची आई डिंपल यादेखील तिला स्वत:चा मार्ग शोधू देण्यावर विश्वास ठेवतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “अदिती फक्त माझ्यासाठी प्रचार करीत नाही, ती तिच्या मुळांशी पुन्हा जोडली जात आहे. ती लोकांसोबत वेळ घालवीत त्यांचे प्रश्न समजून घेत आहे.” अदितीच्या राजकीय भविष्याबद्दल विचारले असता, तिला स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे त्या म्हणाल्या. मी नेहमीच माझ्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्यास पाठिंबा दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील राजकीय तज्ज्ञ काय म्हणतात?
लखनऊ येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील राजकीय शास्त्र विभागाचे प्रमुख शशिकांत पांडे अदितीचा उदय आताच्या पिढीतला एक मोठा बदल म्हणून पाहतात. “अदिती यादवची वाढती उपस्थिती म्हणजे समाजवादी पक्षाने त्यांच्या तिसऱ्या पिढीशी ओळख करून देण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न आहे. सध्या तिच्या वयोमर्यादेमुळे ती निवडणूक लढवू शकत नसली तरी तिचा वाढता सहभाग तरुण पिढीच्या दिशेनं एक योजनाबद्ध पाऊल आहे”, असे पांडे यांनी सांगितले.
“इतर पक्षांप्रमाणे दिखाऊपणा न करता, समाजवादी पक्ष एक लांबवरची खेळी खेळत आहे. ते अदितीला स्वत:हून शिकू देत आहेत, मतदारांशी भावनिकरीत्या जोडू देत आहेत आणि प्रत्यक्षात अनुभव घेऊ देत आहेत. हा दृष्टिकोन ग्रामीण भागात नक्कीच उपयोगी पडेल”, असेही पांडे यांनी नमूद केले आहे.

घटनात्मक मर्यादेमुळे अदिती २५ वर्षांची होईपर्यंत निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तिला लढविता येणार नाही. तर, २०२९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत मात्र ती वयोमर्यादेनुसार पात्र असेल आणि तोपर्यंत तिनं चांगली तयारीदेखील केलेली असेल. सध्या अदितीला समाजवादी पक्षाच्या युवा शाखेत संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तसेच महिला आणि तरुण मतदारांसह सामाजिक संपर्काची भूमिका सोपवली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.