लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातल्याची टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली.

मुंबईतील जमिनींतून ५० हजार कोटी रुपयांचा फायदा अदानींना होणार आहे. या जमिनींवर अदानी सात लाख चौरस फूट बांधकाम करणार असून, त्यातून एक लाख कोटी रुपये कमवतील, असा आरोप करत ‘हे लोक आता अरबी समुद्राचे नावही अदानी समुद्र करतील’, अशी टीकाही आदित्य यांनी केली.

हेही वाचा >>>मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळविण्यासाठी भाजपची रणनीति, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साधणार संवाद

सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांजवळ असलेल्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली. परंतु याच निर्णयाच्या आडोशातून सरकारने भयानक गोष्टी केल्या आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारने निर्णय घेताना जरी सामान्य माणसाला ५० रुपयांचा फायदा करून दिला असला तरी अदानी समूहाला ५० हजार कोटी रुपयांचा फायदा दिला आहे, असेही आदित्या यांनी सांगितले.

ही लूट कशासाठी?

देवनार जमिनीवरून राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये वाद आहे. हा वाद न्यायालयातही गेला होता. एवढी जमीन धारावीची घेतल्यानंतर प्रत्येक धारावीकरांना घर मिळणार आहे का, तर तसेही नाही. कारण जर तुम्ही कंत्राटाची कागदपत्रे पाहिली तर त्यातील अपात्र होणाऱ्या कुटुंबांची संख्या दीड लाख इतकी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुलुंडच्या एका आमदाराने वचन दिले होते की अदानींना दिलेली जमीन आम्ही रद्द करू. रद्द केली का? हे भूखंड रद्द केलेच नाही उलट आणखी भूखंड त्यांना दिले गेले. ही लूट का सुरू आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.